मिरज : जमीन बळकावण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी व त्रासाला कंटाळून कैलास वीरभद्र चौधरी (वय ४५, रा. लिंगनूर) या शेतकऱ्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग करत कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी गावातील पोपट बनसोडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.याबाबत माहिती अशी की, कैलास चौधरी अल्पभूधारक शेतकरी असून त्यांनी काही वर्षांपूर्वी पोपट बनसोडे यास २२ गुंठे जमीन विकली होती. या जमिनीतील १४ गुंठे जमीन शिल्लक राहिली होती. शिल्लक जमीनही मलाच दे असा पोपट बनसोडे यांनी चौधरी यांच्या मागे तगादा लावला होता. मात्र चौधरी यांनी त्यास नकार दिल्याने या वादातून बनसोडे याने तीन वर्षांपूर्वी चौधरी यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. चौधरी यांनी बनसोडे विरुद्ध मारहाणीची तक्रार केली होती. यात चौधरी यांची जामिनावर मुक्तता झाली. मात्र पोपट हा वारंवार त्यांना दमदाटी व शिवीगाळ करून आणखी गुन्हे दाखल करण्याची धमकी देत होता. जमिनीत पीक पेरण्यासही बनसोडे याने प्रतिबंध केला होता. यामुळे त्रासलेल्या चौधरी यांनी काल, गुरुवारी सायंकाळी राहत्या घरी कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी बनसोडे हा वारंवार गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याने या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. चौधरी यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या बनसोडे याच्यावर कठोर कारवाईची मागणी पत्नी लक्ष्मी चौधरीने ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित शिद यांच्याकडे केली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Sangli: धमकी अन् त्रासाला कंटाळून लिंगनूर येथील शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन संपवले जीवन, मृत्यूपुर्वी केला व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:42 IST