रुग्णांकडून उकळले जादा पैसे, आदेशानंतरही परत केेले नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:19 IST2021-06-28T04:19:05+5:302021-06-28T04:19:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ॲपेक्स केअर रुग्णालयात डॉ. महेश जाधव याने पावती न देताच रुग्णांकडून बिलांची वसुली केल्याचे ...

रुग्णांकडून उकळले जादा पैसे, आदेशानंतरही परत केेले नाहीत
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ॲपेक्स केअर रुग्णालयात डॉ. महेश जाधव याने पावती न देताच रुग्णांकडून बिलांची वसुली केल्याचे स्पष्ट झाले आहे. शासकीय नियमांपेक्षा जादा वसुली केल्याचे ऑडिटनंतर पुढे आले. जादा घेतलेले पैसे परत करण्याचे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले.
जिल्हा प्रशासनाने रुग्णालयाला आठ वेळा नोटिसा बजावल्या. जादा पैसे रुग्णांना परत करण्याचे आदेश दिले. रुग्णालयाचा सर्वच कारभार फक्त पैसे मिळवणे याच उद्देशाने सुरु होता. त्यामुळे वैद्यकीय सेवेच्या किमान नीती नियमांकडेही महेश जाधव याने लक्ष दिले नाही. रुग्णांवर दादागिरी करणे, उपचारांचा तपशील न देणे, रुग्णांच्या नातेवाईकांशी संपर्क न होऊ देणे या कारनाम्यांमुळे तक्रारी वाढल्या. त्यातूनच रुग्णालयावर दगडफेक व हल्ले झाले. तक्रारींची दखल घेत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्वत: २२ एप्रिल व २ मे रोजी भेट देऊन पाहणी केली. अतिरिक्त शुल्क आकारणी करणे, बिलांचा तपशील प्रशासनाला उपलब्ध करुन न देणे, योग्य दर्जाचे डॉक्टर्स नसणे अशा तक्रारी वाढल्या. लेखापरीक्षक व जिल्हा कोषागार अधिकारी सुशीलकुमार केंबळे यांच्या पथकालाही योग्य व आवश्यक माहिती दिली नाही. याची गंभीर दखल घेत महापालिकेने ७ मे रोजी रुग्णालयाचा कोविड उपचारांसाठीचा परवाना रद्द केला. सध्याच्या रुग्णांना डिस्चार्ज दिल्यानंतर नवे रुग्ण घेऊ नये असे आदेश दिले. पण डॉ. महेश जाधवने या आदेशांना फाट्यावर बसवत त्यानंतरही कोरोना रुग्ण दाखल करुन घेतल्याचा धक्कादायक प्रकार आढळला. त्यामुळे महापालिका प्रशासनाला अखेर पोलीस कारवाईचे पाऊल उचलावे लागले.
चौकट
वैद्यकीय पंढरीवर डाग
डॉ. महेश जाधवच्या या गुन्हेगारी वृत्तीमुळे ८७ रुग्णांना हकनाक जीव गमवावा लागला आहे. त्याच्या पैशांच्या हव्यासापोटी कित्येक घरे उदध्वस्त झाली आहेत. सांगली, मिरजेच्या वैद्यकीय पंढरीच्या कीर्तीवर डॉ. महेश जाधवने डाग लावल्याची वैद्यकीय क्षेत्राची प्रतिक्रिया आहे.