सांगली जिल्ह्यातून द्राक्षाच्या निर्यातीचा श्रीगणेशा, नऊ कंटेनर दुबईला रवाना

By अशोक डोंबाळे | Updated: January 1, 2025 13:11 IST2025-01-01T13:10:59+5:302025-01-01T13:11:25+5:30

पावणे नऊ हजार शेतकऱ्यांकडून ४७९७ हेक्टरवर निर्यात द्राक्षांची नोंदणी

Export of grapes from Sangli district has started Nine containers left for Dubai | सांगली जिल्ह्यातून द्राक्षाच्या निर्यातीचा श्रीगणेशा, नऊ कंटेनर दुबईला रवाना

सांगली जिल्ह्यातून द्राक्षाच्या निर्यातीचा श्रीगणेशा, नऊ कंटेनर दुबईला रवाना

अशोक डोंबाळे

सांगली : निर्यातक्षम द्राक्ष म्हणून जगभरात ओळख असलेल्या जिल्ह्यातून गोड रसाळ द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली असून सौदी अरेबिया आणि दुबई या देशांमध्ये नऊ कंटेनरमधून १७२ मेट्रिक टन द्राक्ष निर्यातीचा श्रीगणेशा झाला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने जगाला भुरळ घालणाऱ्या सांगलीच्या द्राक्ष हंगामाला सुरुवात झाली आहे. नऊ हजार शेतकऱ्यांकडून पाच हजार ४०० हेक्टर क्षेत्राची निर्यात द्राक्षांसाठी नोंदणी झाली आहे.

द्राक्ष हे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणारे फळ आहे. २०२२-२३ या वर्षात जिल्ह्यातून युरोपियन देशात ८२५ कंटेनरमधून ९ हजार ७०२ टन तर आखाती देशात ४८९ कंटेनरने ७ हजार ६१५ टन अशी एकूण १७ हजार ९३७ टन द्राक्षे निर्यात झाली होती. त्यातून १८० कोटींहून अधिकचे परकीय चलन देशाला मिळाले. २०२३-२४ या वर्षात ८३४ टनाने द्राक्ष निर्यात वाढून १८ हजार ७७१ टन द्राक्षाची जिल्ह्यातून निर्यात झाली होती. त्यातून जिल्ह्याला १८७ कोटींचे परकीय चलन मिळाले होते.

२०२४-२५ या वर्षात जिल्ह्यातून नऊ हजारांवर शेतकऱ्यांनी पाच हजार ४०० हेक्टर क्षेत्राची द्राक्ष निर्यातीसाठी कृषी विभागाकडे नोंदणी केली आहे. दुबई आणि सौदी अरेबियाला निर्यात सुरू झाली असून पहिल्या नऊ कंटेनरमधून १२७ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

द्राक्ष निर्यातीत मिरज, जत तालुक्यांची आघाडी

जिल्ह्यातून सर्वाधिक निर्यात द्राक्षाचे क्षेत्र मिरज तालुक्यात एक हजार ४७४ हेक्टर असून त्यानंतर एक हजार ३९७ हेक्टरसह जत तालुक्याचा नंबर लागत आहे. दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या जत तालुक्याने द्राक्ष निर्यातीत आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

पेटीला ४०० रुपयांवर दर

जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आता सुरू झाला आहे. ४०० रुपये ते ४८० रुपये पेटी (प्रति ४ किलो) असा दर मिळाला आहे, अशी माहिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. जिल्ह्यातील २० ते २५ टक्के बागा डिसेंबर व जानेवारी महिन्यात काढणीला येतील, असेही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

निर्यात द्राक्षासाठी अशी झाली नोंदणी

तालुका - शेतकरी संख्या - क्षेत्र हेक्टरमध्ये

  • मिरज - २६३३  -१४७४
  • वाळवा - १४७  - ७१
  • तासगाव - १४८० - ८६२
  • खानापूर - ९२७  -५७७
  • पलूस - २१० - २०५
  • कडेगाव - २५  - २१
  • आटपाडी - १२३ - ७३
  • जत - २१३२ - १२९७
  • क.महांकाळ - ११३८ - ५०८

नैसर्गिक संकटावर मात करून शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्षे उत्तम दर्जाची तयार केली आहेत. शेतकऱ्यांची नोंदणी वाढली असून द्राक्षांची निर्यात वाढण्याची शक्यता आहे. दुबई, सौदी अरेबियाला निर्यात सुरू झाली असून युरोपला जानेवारीत सुरुवात होईल. -विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

Web Title: Export of grapes from Sangli district has started Nine containers left for Dubai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.