युरियासह महाग खताचे लिंकिंग
By Admin | Updated: September 16, 2014 23:42 IST2014-09-16T22:50:07+5:302014-09-16T23:42:50+5:30
शेतकऱ्यांची लुबाडणूक : कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

युरियासह महाग खताचे लिंकिंग
सांगली : जय किसान युरियाचे युनिट दोन महिन्यांपासून बंद असल्यामुळे जिल्ह्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे़ अन्य कंपन्यांचा युरिया उपलब्ध आहे़ पण, युरिया खताच्या ५० किलोच्या पोत्यासाठी आरसीएफचे १९:१९:१९ ड्रिपचे खत अथवा १८:१८:१८ हे महागडे खत घेण्याची सक्ती केली जात आहे़ डीलर आणि कृषी सेवा केंद्र चालकांच्या लिकिंगमध्ये गरीब शेतकरी भरडला जात असूनही याकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे़ याबद्दल शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत़
खत कंपन्यांकडून महागडी आणि फायदा मिळवून देणारी खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा उद्योग नेहमीच सुरु असतो़ प्रत्येकवेळी शेतकऱ्यांकडून मागणी असणाऱ्या खताची कधी कृत्रिम, तर कधी नैसर्गिक टंचाई दाखवून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे़ डीलरलाही महागड्या खतासाठी जादा कमीशन मिळत असल्यामुळे तेही गुपचूप कृषी सेवा केंद्र चालकांशी लिंकिंगद्वारे खताची विक्री करीत आहेत़ परंतु, काही कृषी सेवा केंद्र चालकांचे लिंकिंग खतामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे़ कारण, सध्या युरिया खताची जिल्ह्यात टंचाई आहे़ या पार्श्वभूमीवर डीलरकडून दहा टन युरिया खताबरोबर कृषी सेवा केंद्र चालकांना १८:१८:१८ खत अथवा आरसीएफचे १९:१९:१९ ड्रिपचे खत घेण्याची सक्ती केली जात आहे़ साध्या युरियाचा ५० किलो पोत्याचा दर २८२ रुपये आणि निम कोटेडचा दर २९२ रुपये आहे़ या खताबरोबर ९८० रूपये किमतीचे १८:१८:१८ हे खत अथवा २१५० रूपये किमतीचे आरसीएफचे १९:१९:१९ ड्रिपचे खत घेण्याची सक्ती केली जात आहे़ पाऊस चांगला झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांबरोबरच उसासाठी शेतकऱ्यांतून युरियाला मागणी आहे़ परंतु, शेतकऱ्यांची ही गरज ओळखून खताचे मुख्य वितरक आणि कृषी सेवा केंद्र चालक लिंकिंगद्वारे त्यांची आर्थिक लूट करीत आहेत़ याविरोधात शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत़ (प्रतिनिधी)