तासगावात प्रस्ताव देऊनही
By Admin | Updated: July 5, 2014 00:01 IST2014-07-04T23:06:37+5:302014-07-05T00:01:01+5:30
रोजगार हमीची कामे बेदखल

तासगावात प्रस्ताव देऊनही
शेतकऱ्यांत नाराजी : वर्षभरापूर्वी प्रस्ताव पाठविले
तासगाव : तासगाव नगरपरिषद हद्दीतही रोजगार हमी योजनेची कामे सुरू व्हावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. विविध कामांचे प्रस्तावही मागीलवर्षीच शेतकऱ्यांनी दिले आहेत. मात्र या योजनेची कामे शहर हद्दीत सुरू होऊ शकलेली नाहीत.
केंद्र सरकारने कायदा बनविल्यानंतर या योजनेवर निधीची कमतरता नाही. मागणी असेल तर काम द्यावे लागेल. असे असताना या योजनेची कामे तासगावात सुरू होण्यात काय अडचण? असा सवाल विचारला जात आहे. तासगावला नगरपरिषद आहे म्हणून ते शहरात गणले जाते. त्याहीपेक्षा तासगावला शेतजमिनीचे सुमारे तीन हजार ३१२ हेक्टर क्षेत्र आहे. मोठ्या प्रमाणावर शेतीक्षेत्र असलेले हे गाव आहे.
मनरेगा ही योजना ग्रामीण भागातल्या कामांसाठी असली तरी, त्याला ‘क’ वर्ग नगरपालिका अपवाद आहेत. शासनाच्या परिपत्रकानुसार क दर्जाच्या पालिकांना रोहयोची कामे करता येतात. तासगावची पालिका ही क दर्जाची असल्याने तासगावात कामे होणे अपेक्षित आहे.
तासगावचे अर्थकारण केवळ शेतीवर अवलंबून आहे. रोहयोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट लाभ मदतीपेक्षा जास्त उपयुक्त ठरणार आहे. मागीलवर्षी तासगावातून सुमारे ५० विहिरींचे प्रस्ताव नगरपरिषदेत दाखलही झाले होते. यावर पालिका बैठकीत चर्चाही झाली. परंतु ही कामे सुरू झालेली नाहीत.
रोहयोच्या माध्यमातून अनेक प्रकारची कामे करता येतात. यामध्ये वैयक्तिक लाभाचीही कामे आहेत. विहिरींसारखी कामे शेतकऱ्यांना पिढ्यान् पिढ्या उपयोगी पडणारी आहेत. बांध घालणे, सलग समपातळी चर खुदाई करणे, बांधावर वृक्ष लागवड करणे अशी कामे करता येतात. ग्रामीण भागात शेकडो विहिरींची कामे झाली आहेत. आज त्या क्षेत्रांना पाणी उपलब्ध झाल्याने बागायती उत्पन्न घेता येणे शक्य झाले आहे. (वार्ताहर)