जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात प्रतीक यांची ‘एन्ट्री’
By Admin | Updated: September 15, 2014 23:13 IST2014-09-15T22:33:30+5:302014-09-15T23:13:37+5:30
ताकारीत बैठक : काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होऊ नये, अशीच इच्छा

जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात प्रतीक यांची ‘एन्ट्री’
बोरगाव : ग्रामीण विकासमंत्री जयंत पाटील यांंच्या बालेकिल्ल्यात आठ वर्षांनंतर आज माजी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांची एन्ट्री झाली. काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी होऊ नये, ही माझी मनापासूनची इच्छा आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. जयंतरावांना शह देण्यासाठी वाळवा तालुक्याच्या शेवटच्या टोकापासून काँग्रेसची मोट बांधण्याचा माझा प्रयत्न आहे. एकदा दोन्ही पक्ष समोरासमोर लढून तरी बघुया, की कोण किती पाण्यात आहे. काँग्रेस पक्षाला इतिहास आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत एका व्यक्तीचा अर्थात मोदी फॅक्टर चालणार नाही, असे मत प्रतीक पाटील यांनी व्यक्त केले. ताकारी (ता. वाळवा) येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
पाटील म्हणाले, जयंत पाटील जर सांगलीत येऊन राजकारण करत असतील, तर त्यांच्या मतदारसंघात आमच्या अजोबांपासूनचे ऋणानुबंध आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना रिजार्च करण्याची वेळ आली आहे. मी आता पाच वर्षे मोकळा आहे. सर्व वेळ राजकारणासाठी देऊन वसंतदादांनी बांधलेली काँग्रेसची मोट व बापूंनी जपलेला वारसा पुन्हा ताकदीने पुढे चालू ठेवणार आहे. मात्र कार्यकर्त्यांनी वायफळ खर्च न करता मला आता कामे सांगावीत, अहोरात्र सेवेसाठी उभा राहीन.
काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्रपणे लढले, तर या इस्लामपूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणू. परंतु एकत्र लढलो, तर राजकीय समीकरणे त्या-त्या वेळेला बदलतील. काँग्रेसच्या माध्यमातून माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील यांना संधी देणार का? असा सवाल पाटील यांना केला असता, अजून पक्षाने कोणताही उमेदवार ठरवला नसून पक्ष ज्याला संधी देईल, त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचे सांगितले.
वाळवा तालुक्यात राजकारणात सक्रिय होणार असून वसंतदादांचा वारसा या मतदारसंघास दाखवून देणार आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पाटील यांनी शेवटी, आमचे कार्यकर्ते शेतकरी संघटनेत सामील झाले आहेत. त्यांना पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर आणण्याची कसरत आम्हाला करावी लागणार आहे. यामध्ये नक्कीच यश मिळेल, असे सांगितले.
यावेळी माजी जि. प. सदस्य जितेंद्र पाटील, वैभव पवार, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष किरण चव्हाण, प्रमोद शिंदे, निशिकांत पाटील, निवास पाटील, दीपक लकेसर, प्रकाश पाटील, अशोक देसाई, पांडुरंग मोरे, धनाजी सावंत उपस्थित होते. (वार्ताहर)
आगे आगे देखो..!
आघाडी झाली तर जयंत पाटील यांचा प्रचार करणार का? या प्रश्नावर प्रतीक पाटील यांनी मिष्किलपणे बोलताना ‘आगे आगे देखो होता है क्या, मी तुम्हाला भरपूर मसाला देईन, वाट पाहा,’ असे उत्तर दिले. या सर्व घडामोडीमुळे जयंत पाटील गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे.