उद्योजक वळले आठवडा बाजारांकडे
By Admin | Updated: March 17, 2015 00:07 IST2015-03-16T23:11:31+5:302015-03-17T00:07:46+5:30
कडेगाव तालुक्यातील स्थिती : शिवाजीनगर-कडेगाव औद्योगिक वसाहतीला घरघर

उद्योजक वळले आठवडा बाजारांकडे
रजाअली पीरजादे - शाळगाव शिवाजीनगर-कडेगाव औद्योगिक वसाहत जवळजवळ बंद अवस्थेत असल्याने उद्योजक आता आठवडा बाजारांकडे वळले असून, त्यातून चांगल्या प्रकारची कमाई होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
शिवाजीनगर-कडेगाव औद्योगिक वसाहत सुरू झाली तेव्हा लहान-मोठे असे जवळजवळ १०० हून अधिक उद्योग सुरू झाले होते. नंतर याची संख्या वाढत जाऊन ५०० च्या घरात गेली होती. अशा परिस्थितीत शासनाच्यावतीने गारमेंट पार्क, टेक्स्टाईल पार्क सुरू करण्यात आले. हा उद्योग मोठ्याप्रमाणात भरभराटीला आला. परंतु वस्त्रोद्योगाबाबत शासनाची धरसोडवृत्ती, मजुरांचा प्रश्न, वाढती मजुरी, वाढते वीजबिल आणि अशा परिस्थितीत बॅँक आॅफ इंडियाने थकित कर्जापोटी ठोकलेले टाळे या सर्व गोष्टींमुळे येथील उद्योजक मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला. सुमारे १५०० मजूर बेकार झाले. उपासमारीची वेळ आली, साहजिकच अनेक लहान-मोठे उद्योग बंद पडले. लहान उद्योजकांवर संकट कोसळले. यातून मार्ग काढण्यासाठी उद्योजकांनी आणि बेकार मजुरांनी यावर आठवडा बाजार हे प्रभावी शस्त्र बाहेर काढले असून, त्यातून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आता हळूहळू सुटू लागला आहे. असे जरी असले तरी गेली अनेक दिवस येथील औद्योगिक वसाहतीच्या समस्या सुरू असून, याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे ही वसाहत बहरण्याऐवजी हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर दिसून येते.
यासाठी नवीन सरकार, स्थानिक नेतेमंडळींनी लक्ष घालणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान, उद्योजक व बेकार मजुरांनी आपल्या उपजीविकेसाठी आता आठवडा बाजार सुरू केला असून, त्यातून त्यांची चांगली कमाई होऊन पोटापुरते मिळू लागले आहे. त्यामुळे उद्योजकांत उद्योग सुरू करण्यापेक्षा आठवडा बाजारांवरच अधिक लक्ष केंद्रित करीत असल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.
शहरातील वस्तू ग्रामीण भागात उपलब्ध
शहरात मॉल संस्कृती फोफावत असताना त्याच धर्तीवर परंतु वेगळ्या पध्दतीने आता आठवडा बाजार भरताना दिसतात. सर्व व्यवहार रोख असल्याने उद्योजकांनाही परवडते. रोज एक बाजार असा आठवडाभर बाजार चालतो. त्यामुळे बेकारीचा प्रश्न रहात नाही. कमी-अधिक प्रमाणात दररोज पैसे मिळत असतात. पूर्वी कडेगाव तालुक्यात केवळ कडेगाव येथे एकच आठवडा बाजार भरत असे. आता जवळजवळ गावोगावी बाजार सुरू झाले आहेत. कडेपूर, शाळगाव, नेर्ली, देवराष्ट्रे, खेराडे-वांगी, नेवरी, चिंचणी या गावातून आता बाजार भरू लागले आहेत. एक हजारपासून पाच हजारापर्यंत माल असला की बऱ्यापैकी पैसे मिळतात. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांबरोबर आता शहरीकरणामुळे मोठे व्यावसायिकही आठवडा बाजारात उतरले आहेत. त्यामुळे शहरातील वस्तू आता ग्रामीण भागात मिळू लागल्या आहेत. साहजीकच शहराकडे बाजारासाठी जाणारे लोंढे आता कमी झाल्याचे दिसू लागले आहेत.