जवान निलेश कदम यांना भावपूर्ण निरोप
By Admin | Updated: July 7, 2014 00:34 IST2014-07-07T00:32:37+5:302014-07-07T00:34:30+5:30
शेगावमध्ये अंत्यसंस्कार : हजारो नागरिकांची उपस्थिती

जवान निलेश कदम यांना भावपूर्ण निरोप
शेगाव : अमर रहे, अमर रहे, शहीद जवान निलेश निकम अमर रहे! या घोषणांनी शेगाव (ता. जत) येथे निलेश काकासाहेब निकम यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. जवान निलेश निकम यांना सीमेवर गस्त घालताना श्वसनाचा त्रास झाला होता. समुद्रसपाटीपासून सुमारे १८००० फूट उंचीवर लडाख येथे निकम कर्तव्य बजावत होते. श्वसनाच्या त्रासामुळे त्यांचे निधन झाले, हे समजताच गावावर शोककळा पसरली. ही गावातील पहिलीच घटना होती. निकम यांचे पार्थिव काल सकाळी ७ वाजता त्यांच्या राहत्या घरी आणल्यानंतर निलेशचे आई, वडील व बहिणीने हंबरडा फोडला. एकुलता एक मुलगा शहीद झाल्याने निकम कुटुंबियांना दु:ख अनावर झाले होते.
यावेळी ग्रामस्थांचे डोळे पाण्याने डबडबले होते. ७ वाजून २५ मिनिटांनी पोलिसांच्यावतीने, ७ वाजून ३० मिनिटांनी कोल्हापूर येथील टी. ए. बटालियनच्या जवानांनी मानवंदना दिली. यावेळी अंत्यदर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. आठ वाजता निकम यांचे पार्थिव डिजिटल फलक व फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये ठेवून गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी घोषणांनी पसिरातील वातावरण भावूक झाले होते. अकरा वाजता अंतराळ रोडजवळील शेगाव येथील स्मशानभूमीत पार्थिव ठेवण्यात आले.
स्मशानभूमीत पुन्हा कोल्हापूर येथील टी. ए. बटालियनचे सुभेदार पंडित पाटील व त्यांच्या जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी झाडून, तर पोलीस दलातील लक्ष्मण चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन फै री झाडून मानवंदना दिली. यावेळी तहसीलदार दीपक वजाळे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कृष्णाकांत उपाध्याय यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तालुक्याचे नेते विलासराव जगताप, आमदार प्रकाश शेंडगे, भारती बँकेचे संचालक विक्रम सावंत, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, जि. प. सदस्य सुरेश मुटेकर, संजय सावंत, नगरसेवक उमेश सावंत, रवी सावंत, अॅड. प्रभाकर जाधव, बाबूराव दुधाळ, डी. एस. पतंगे, सरपंच सौ. रंजना तानाजी हिरवे, माजी आमदार मधुकर कांबळे यांनीही श्रद्धांजली वाहिली. यावेळी कोसारी, काशिलिंगवाडी, सिंगन्नहळ्ळी, बागलवाडी, कुंभारी, बनाळी, वाळेखिंडी या भागातील नागरिकही उपस्थित होते. रविवारी गावातील सर्व व्यवहार दिवसभर बंद ठेवण्यात आले होते. (वार्ताहर)