सांगलीतील ४५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार, 'अशी' असणार आचारसंहिता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 14:29 IST2022-11-09T14:28:57+5:302022-11-09T14:29:22+5:30
राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी पूर्ण

सांगलीतील ४५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार, 'अशी' असणार आचारसंहिता
सांगली : जिल्ह्यातील लवकरच ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यातच ग्रामपंचायत निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू आहे.
राज्य निवडणूक आयोगाने दि. ७ नोव्हेंबर २०२२ रोजी एक परिपत्र काढून ग्रामपंचायत निवडणूक कशापद्धतीने घ्यावी, त्याची आचारसंहिता प्रत्येक जिल्ह्याला पाठविली आहे. यामध्ये मतदार याद्या, निवडणुकीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आदीबाबत सूचना दिल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून स्वतंत्ररीत्या निवडणूक कार्यक्रम येणार आहे.
आयोगाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. राज्य निवडणूक आयोगाची ही तयारी लक्षात घेता, कोणत्याही क्षणी जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.
अपर जिल्हाधिकारी निवडणूक निरीक्षक असणार
जिल्ह्यामध्ये १००पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिका आहेत, अशा जिल्ह्यांमध्ये विभागीय आयुक्त यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून अपर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये १०० पेक्षा कमी ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत, त्याठिकाणी संबंधित उपविभागीय अधिकारी यांची निवडणूक निरीक्षक म्हणून संबंधित जिल्हाधिकारी यांनी परस्पर नेमणूक करावी.
अशी असणार आचारसंहिता
जिल्ह्यामध्ये ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता लागू राहील. तसेच ज्या तालुक्यात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू असणार आहेत. निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींच्या सीमेलगतच्या गावांमध्येसुद्धा आचारसंहिता लागू राहील.
निवडणुका होणार ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या
तालुका - ग्रामपंचायत संख्या
मिरज ३८
तासगाव २६
कवठेमहांकाळ २९
जत ८१
खानापूर ४५
आटपाडी २६
पलूस १६
कडेगाव ४३
वाळवा ८८
शिराळा ६०
एकूण ४५२