बिगुल वाजले, सांगली जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या १८९ जागांसाठी निवडणुकीचा रणसंग्राम सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:24 IST2025-11-05T14:23:09+5:302025-11-05T14:24:09+5:30
इच्छुकांकडून मोर्चेबांधणी : पाच नगरपालिका, तीन नगरपंचायतींचा समावेश

बिगुल वाजले, सांगली जिल्ह्यात आठ नगरपालिकांच्या १८९ जागांसाठी निवडणुकीचा रणसंग्राम सुरू
सांगली : जिल्ह्यातील उरुण-ईश्वरपूर, तासगाव, विटा, जत, आष्टा नगरपालिका आणि पलूस, शिराळा, आटपाडी नगरपंचायतीमधील आठ नगराध्यक्षांसह १८९ नगरसेवकांच्या जागांसाठी मंगळवारी राज्य निवडणूक आयुक्तांनी निवडणुकीची आचारसंहिता जाहीर केली. इच्छुकांनी लगेच प्रभागातील कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यासह नेत्यांकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून झाल्या नाहीत. यामुळे सर्वच पक्षांतील दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर होता. अखेर या नेत्यांचा विचार करून राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकाची घोषणा केली. नगरपालिका, नगरपंचायतीसाठी मंगळवारी सायंकाळपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.
शहरातील राजकीय नेत्यांचे डिजिटल फलक हटविण्यास प्रशासनाने सुरुवात केली. दि. १० नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून दि. १७ नोव्हेंबर अंतिम मुदत आहे. १८ नोव्हेंबरला छाननी असून २५ नोव्हेंबर अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होताच इच्छुकांनी प्रभागात मोर्चेबांधणी सुरू केली. महायुती, महाविकास आघाडीच्या निर्णयाकडेही सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. तीन वर्षांनंतर निवडणुका होत असल्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, उद्धवसेना, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणुकीतील विजयासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
नगरपंचायत, नगरपालिकांची नगरसेवक संख्या
नगरपंचायत-नगरपालिका / नगरसेवक संख्या/ नगराध्यक्ष
उरुण-ईश्वरपूर / ३० / १
तासगाव / २४ / १
विटा /२६ / १
जत / २३ / १
आष्टा / २४ / १
आटपाडी / १७ / १
शिराळा / १७ / १
पलूस / २० / १