तरुणाई अडकली नशेच्या विळख्यात! अंमली पदार्थ विरोधी दिन

By Admin | Updated: July 28, 2014 23:22 IST2014-07-28T22:43:10+5:302014-07-28T23:22:36+5:30

गांजाची तस्करी : झंडूबाम, स्पिरीटचा नशेसाठी वापर, व्यापक जनजागृतीची गरज

Elder strained into addiction! Anti-drug days | तरुणाई अडकली नशेच्या विळख्यात! अंमली पदार्थ विरोधी दिन

तरुणाई अडकली नशेच्या विळख्यात! अंमली पदार्थ विरोधी दिन

सचिन लाड -सांगली ,,अपघातात बळी पडणारे, गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्यांमध्ये २० ते ३० वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांच्या रेकॉर्डवरुन दिसून येते. नशेत भरधाव वेगाने वाहन चालविणे, चैनीसाठी गुन्हेगारीचा प्रवास निवडणे, अशी कारणे पुढे येत असल्याने तरुणाई व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकली असल्याचे चित्र आहे. या विळख्यातून तरुणाईला बाहेर काढणे कठीण असून, यासाठी व्यापक जनजागृतीची गरज आहे.

जत, शिराळा तालुक्यांमध्ये असलेली गांजाची शेती उघडकीस आली होती. जत तालुक्यातील कर्नाटकच्या सीमेवर अजूनही गांजाच्या झाडांची लागवड होत आहे. जतमधून कर्नाटकात, तर कर्नाटकातून मिरजेत गांजाची तस्करी होत आहे. विशेषत: ख्वाजा वस्तीमध्ये गांजाची विक्री खुलेआम होत आहे. यासाठी साखळी कार्यरत आहे. शंभर रुपयांना दहा ग्रॅमपर्यंतचा गांजा प्लॅस्टिकच्या पाकिटामध्ये विक्री करण्यात येत आहे. गांजाच्या विक्रीसाठी लहान मुलांचाही वापर करण्यात येत आहे. तीन वर्षांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाच ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त केली होती. त्यानंतर सांगली जिल्ह्यात हेरॉईन, कोकेन, ब्राऊन शुगर आदी मादक पदार्थ सापडलेले नाहीत. सांगली परिसरात त्याची विक्री होत असल्याचे वृत्तही नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. मादक पदार्थांना बळी पडलेले रुग्णही अद्याप आपल्या परिसरात नाहीत.

झंडूबाम, स्पिरीट अन् नशेच्या गोळ्या
तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. पानपट्टीवर गुटखा, मावा, दारू, सिगारेट यासाठी तरुणांची गर्दी दिसते. बोलताना तोंडातून याची दुर्गंधी येऊ नये, यासाठी काही तरुण झंडूबाम, स्पिरीट व नशेच्या गोळ्या सेवन करीत आहेत. बंद पडलेल्या शाळा किंवा निर्जन ठिकाणं तरुणांच्या टोळक्यांनी नशेचा अड्डा बनविला आहे. झंडूबाम रुमालावर टाकून त्याचा नाकाद्वारे वास घेतात. यातून त्यांना नशा येते. स्पिरीटचाही नशेसाठी अशाचप्रकारे वापर केला जात आहे. मेडिकलमधून नशेच्या गोळ्या खरेदी केल्या जात आहेत.

गुटखा, मावा बंदी कागदावरच
४राज्य शासनाने गुटखा व मावा विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र आजही पानपट्टीवर त्याची खुलेआम विक्री सुरू आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. सुगंधित तंबाखू सहजपणे उपलब्ध होत असल्याने त्याचा मावा तयार करण्याची वापर केला जात आहे. गुटख्याची चोरुन विक्री केली जात असली तरी, मावा कोणत्याही पानपट्टीत सहजपणे मिळतो. तो सेवन करणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण मोठे आहे. यामुळे गेल्या काही महिन्यात दहा रुपयाला मिळणाऱ्याा माव्याची ४० रुपये दराने विक्री केली जात आहे.

गांजा विक्रीचा अड्डा
मिरजेतील रेल्वे स्टेशन व बसस्थानक परिसरात गांजा विकणारी टोळी सक्रिय आहे. कर्नाटकातील विजापूर व ओरिसा राज्यातून गांजाची तस्करी केली जात असल्याचे समजते. दहा ते वीस ग्रॅमच्या पुडीतून गांजाची विक्री केली जात आहे. बशीर, आसाद, बिल्ली, खुशबू या टोपण नावाने गांजाची विक्री सुरु आहे. यातील बिल्ली नावाच्या महिलेला गांजा विक्रीप्रकरणी न्यायालयाने शिक्षाही सुनावली होती.

अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे. जिल्ह्यात या पदार्थांची तस्करी होत नाही. गांजाची विक्री होत असल्याची माहिती आहे. खबऱ्यामार्फत माहिती मिळाल्यानंतर गांजाच्या शेतीवर तसेच विक्री अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली जात आहे. यासंदर्भात अधिक माहिती असल्यास नागरिकांनी संपर्क साधून माहिती दिली पाहिजे.
- दिलीप सावंत, जिल्हा पोलीसप्रमुख, सांगली.
अंमली पदार्थांचे कोणतेही सेवन असो, त्याने मेंदूमध्ये डोकामाईन नावाचे रसायन तयार होते. हे रसायन व्यसनी माणसाच्या मनात कृत्रिम आनंद निर्माण करते. यातून त्यांना नैसर्गिक आनंदाची ओढ कमी होते. प्रयत्न करूनही व्यसन सोडवत नाही. यातून आर्थिक, नैतिक व शारीरिक नुकसान होते. यामुळे व्यसनाची सुरुवातच न करणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. चारुदत्त कुलकर्णी, मानसोपचार तज्ज्ञ, सांगली.

Web Title: Elder strained into addiction! Anti-drug days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.