पूर्व आणि पश्चिम भागाचा आळीपाळीने समावेश
By Admin | Updated: September 15, 2014 00:03 IST2014-09-14T23:08:42+5:302014-09-15T00:03:32+5:30
मिरज मतदारसंघ : ग्रामीण मतदारांची संख्या निर्णायक

पूर्व आणि पश्चिम भागाचा आळीपाळीने समावेश
सदानंद औंधे- मिरज -पश्चिमेस नदीकाठ आणि पूर्वेस दुष्काळ अशी भौगोलिक परिस्थिती असलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघात गेल्या ६० वर्षात पूर्व व पश्चिम भागाचा आळीपाळीने समावेश झाला आहे. राजकीय कारणामुळे कवठेमहांकाळला जोडण्यात आलेली मिरज पूर्व भागातील गावे पुन्हा मिरज विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आल्याने ग्रामीण मतदारांचा कौैल निर्णायक ठरणार आहे.
१९५२ मध्ये ६५ हजार असणारी मिरज विधानसभा मतदारसंघाची मतदारसंख्या आज तीन लाखापर्यंत पोहोचली आहे. मिरज शहर, आरग, मालगाव, बेडग यासह पूर्वभागातील गावांचा मिरज मतदारसंघात समावेश होता. मिरज विधानसभा मतदारसंघ सुरुवातीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला होता. १९७२ मध्ये डॉ. एन. आर. पाठक यांनी दुष्काळी कवठेमहांकाळ, जत, मिरज तालुक्याच्या स्वतंत्र मिरज जिल्ह्याची मागणी करीत काँग्रेसविरोधात निवडणूक लढवून विजय मिळविला. डॉ. पाठक यांना मिरज पूर्व भागातील गावांतून दुष्काळग्रस्तांचा जोरदार पाठिंबा मिळाला. त्यामुळे १९७८ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मिरज पूर्व भागातील गावे कवठेमहांकाळला जोडून मतदारसंघाची फेररचना करण्यात आली. त्याऐवजी पश्चिम भागातील नांद्रे, वसगडे, बिसूर, कवलापूर, बुधगाव, माधवनगर ही काँग्रेस समर्थकांची मोठी संख्या असलेली गावे मिरज मतदारसंघाला जोडण्यात आल्याने १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मिरजेत काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले.
मागील निवडणुकीपूर्वी मतदारसंघाच्या पुनर्रचनेत तब्बल ३० वर्षांनंतर पश्चिम भागातील गावांचा सांगली मतदारसंघात व पूर्व भागातील गावांचा मिरज मतदारसंघात समावेश झाला आहे. निलजी, धामणी, अंकली ही नदीकाठची गावेही मिरजेतून वगळून सांगली मतदारसंघाला जोडण्यात आली आहेत. मतदारसंघाची भौगोलिकता बदलल्याने मागासवर्गीय मतदारांची संख्या वाढून २००९ पासून मिरज विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. पूर्व व पश्चिम भागातील गावे आलटून-पालटून समाविष्ट करण्यात आल्याने मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. मिरज शहरापेक्षा मिरज पूर्व भागातील मतदारांची संख्या जास्त असल्याने या पूर्व भागातील मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे.
मिरज मतदारसंघाची भौगोलिक रचना वारंवार बदलण्यात आली असली तरी, मतदारांनी सर्वपक्षीय व सर्वधर्मिय उमेदवारांना निवडून दिले आहे. मिरजेतील मतदारांचे हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
मिरज शहरात लिंगायत व मुस्लिम, तर ग्रामीण भागात जैन व मराठा मतदारांची संख्या लक्षणीय आहे. लोकसभेवेळी प्रथम शहरी मतदारांनी काँग्रेसविरोधी मतदान करून परंपरा खंडित केली होती.
मिरज शहर व पूर्व भागातील गावांची संस्कृती, समस्या भिन्न आहेत. शहरात नागरी सुविधांचा अभाव, तर ग्रामीणमध्ये पाणीटंचाई, म्हैसाळ योजनेचे पाणी हा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत शहरी व ग्रामीण मतदारांचा कल वेगवेगळा राहिला आहे.