रस्त्यांच्या राजकारणात आरोपांचा धुरळा, सात रस्त्यांच्या मार्गात कोणाचा अडथळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:29 IST2021-08-22T04:29:05+5:302021-08-22T04:29:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सध्या रस्त्यावरुन राजकारण ...

The dust of accusations in the politics of roads, whose obstacle in the way of seven roads? | रस्त्यांच्या राजकारणात आरोपांचा धुरळा, सात रस्त्यांच्या मार्गात कोणाचा अडथळा?

रस्त्यांच्या राजकारणात आरोपांचा धुरळा, सात रस्त्यांच्या मार्गात कोणाचा अडथळा?

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सध्या रस्त्यावरुन राजकारण रंगले असताना सांगली जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या रस्त्यांची कामे राजकीय विरोधामुळे तर अनेक कामे अकारण थांबली आहेत. राजकारण्यांच्या या गोंधळात खराब रस्त्यांवरील नागरिकांच्या खस्ता काही केल्या कमी होत नाहीत.

चांगल्या रस्त्यांवर चांगले आरोग्यही अवलंबून आहे, मात्र सांगली जिल्ह्यातील नागरिकांच्या नशिबी चांगल्या रस्त्यांचे नव्हे खराब रस्त्यांचेच भोग आहेत. केवळ नागरिकांपुरताच हा विषय मर्यादीत नाही, तर व्यापारी पेठा, उद्योग विकसित होण्याचा मार्गही यामुळे खुंटला आहे. त्यामुळे प्रगतीऐवजी अधोगतीच्या मार्गावरुन जिल्ह्याची वाटचाल सुरु आहे. रस्ते, पूल होत असताना काही ठिकाणी पक्षांतर्गत राजकारण आले, तर काही ठिकाणी राजकारण नसतानाही रेंगाळलेपण आले आहे.

चौकट

हे रस्ते कोणी रोखले

सांगली ते पेठ या मार्गासाठी नितीन गडकरी यांनी २२ कोटी रुपये मंजूर केले आहेत. तरीही काम सुरु नाही.

मिरजेतील शिवाजी रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात येणार आहे. यासाठीही निधी मंजूर करुनही त्याचे काम रखडले आहे.

कऱ्हाड ते तासगाव दरम्यान महामार्गाच्या निकृष्ट बांधकामाला शिवसेनेने विरोध केला आहे. त्यामुळे हे काम सध्या रेंगाळले आहे.

रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील धामणी ते मिरज दरम्यान फ्लायओव्हरच्या मागणीसाठी आंदोलन झाले आहे.

सांगली बसस्थानक ते अंकली या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला कोणाचाही विरोध नसताना सुरुवात झालेली नाही.

सांगलीतील आयर्विन पुलाला पर्यायी असलेला जवळचा पूल उभारण्याचे काम भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी मंजूर करुन आणले असतानाही त्याला होत असलेल्या विरोधामुळे तो बंद आहे.

सांगली ते विटा हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग केल्यानंतरही त्याच्या कामाचा रस्ता बंद आहे.

कोट

शिवसेनेने कऱ्हाड ते तासगाव दरम्यानच्या रस्त्याच्या कामाला त्याच्या निकृष्ट दर्जामुळे विरोध केला होता. गडकरींचे नाव रस्ते कामासाठी घेतले जाते. त्यामुळे अशा निकृष्ट कामामुळे त्यांचेच नाव खराब होईल. त्यामुळे ठेकेदारासाठी नव्हे तर जनतेसाठी रस्ते करावेत.

- संजय विभुते, जिल्हाप्रमुख, शिवसेना

कोट

चांगले रस्ते होण्यासाठी सर्वांचाच आग्रह असला पाहिजे. रस्ते कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या शासकीय यंत्रणांनी याबाबत अधिक सतर्क असले पाहिजे. पूर्वी दहा वर्षे रस्ते टिकत होते. आता तशी परिस्थिती नाही. राजकारण करण्यापेक्षा चांगले रस्ते व्हावेत, ही अपेक्षा.

- अविनाश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

कोट

गडकरी यांनी मंजूर केलेले रस्ते कोणाचाही विरोध नसताना का सुरु झालेले नाहीत. आम्हाला राजकारण करायचे नाही, पण मंजूर केलेले रस्ते तरी लवकरात लवकर पूर्ण करावेत.

- पृथ्वीराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

कोट

जिल्ह्याचा विकास महत्त्वाचा आहे. त्यासाठी प्रसंगी सर्व पक्षांनी एकत्रित ताकद लावावी. निवडणुकीत जरुर वादविवाद असावेत, पण विकासकामात राजकारण आणता कामा नये. मंजूर झालेले पैसे परत जाणार नाहीत किंवा काम थांबणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी.

- पृथ्वीराज देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप

Web Title: The dust of accusations in the politics of roads, whose obstacle in the way of seven roads?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.