वयाला ओहोटी लागलीय साहेब, सांगा ना कधीय शिक्षक भरती?, तरुणांची मानसिकता ढासळत चालली
By शरद जाधव | Updated: December 9, 2023 12:05 IST2023-12-09T12:05:19+5:302023-12-09T12:05:39+5:30
शिक्षक भरती लांबल्याने तरुणांची मानसिकता ढासळली

वयाला ओहोटी लागलीय साहेब, सांगा ना कधीय शिक्षक भरती?, तरुणांची मानसिकता ढासळत चालली
सांगली : राज्य सरकारने शिक्षक भरतीची घोषणा करूनही त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने तरुणांची धाकधूक वाढली आहे. प्रत्येकवेळी नवीन कारण देऊन भरती पुढे ढकलली जात असल्याचा आरोप आता तरुण करत आहेत. प्रसंगी कर्ज काढून शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले मात्र, शासनाच्या धोरणामुळे ते अपूर्णच राहत असल्याने तरुणांची मानसिकताही ढासळत आहे. शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या संघटनांनी केलेल्या एका पाहणीत भरती लांबल्याने तरुणांची मानसिक स्थिती ढासळत चालल्याचे समोर आले आहे.
राज्य शासनाने सुरुवातीला ३० हजार शिक्षक भरतीची घोषणा केली. त्यानंतर हीच संख्या ५५ हजारांवर गेली. शासनाने घोषणा केलेल्या दीड लाख भरतीमध्ये याचा समावेश असल्याने डीएड, बीएड तरुणांमध्ये उत्साह होता. ‘पवित्र’प्रणालीद्वारे ही प्रक्रिया होणार असल्याने पारदर्शक भरती होण्याबाबतही तरुणांना खात्री होती. मात्र, आता प्रक्रियाच पुढे जात नसल्याचे चित्र आहे.
सोशल मीडियावर चर्चा आणि सूर
शिक्षक भरती तातडीने व्हावी यासाठी सोशल मीडियावर नेहमीच चर्चा करण्यात येते. यात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘हॅशटॅग’ही वापरण्यात येत आहे. याद्वारे तरुणांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे का? याबाबत चर्चा करण्यात आली. यात ९६ टक्क्यांहून अधिक तरुणांनी हो भरती रखडल्याने मानसिकता बिघडत असल्याचे सांगितले.
भरती होणार तरी कशी?
शिक्षक भरती व्हावी यासाठी पाठपुरावा करणाऱ्या डीएड, बीएड स्टुडंड असोसिएशनकडून अधिवेशन कालावधीत नागपूर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. सोमवारी होणाऱ्या या आंदोलनात इयत्ता पहिली ते १२वी इयत्तेपर्यंत ८० टक्के रिक्त पदे तत्काळ आणि एकाचवेळी भरण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. यासह इंग्रजी माध्यमाला प्राधान्य देणारा शासन आदेश रद्द करण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
मानसशास्त्रज्ञ काय म्हणतात..?
मानसोपचारतज्ज्ञ पवन गायकवाड यांनी सांगितले की, तरुणांमध्ये सध्या असुरक्षितता वाढत आहे. त्यात जे शिक्षण घेतले त्याचे आपल्या करिअरसाठी उपयोग व्हावा यासाठीही त्यांचे प्राधान्य असते. मात्र, अशाप्रकारे जर त्यात अडथळे आलेतर तरुणांची मानसिक स्थिती चांगली राहणार नाही. यासाठी तरुणांनी आपल्या आवडीच्या कामात स्वत:ला गुंतवून घ्यावे.
राज्यभरातील लाखो तरुण भरतीकडे लक्ष ठेवून आहेत. डीएड, बीएड झाल्यानंतर शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी शासनाचे धोरण कारणीभूत ठरत आहे. शासनाने आता तत्काळ पवित्र पोर्टलद्वारे पूर्ण भरतीप्रक्रिया राबवावी आणि अडचणी दूर कराव्यात. - संतोष मगर, राज्याध्यक्ष, डीएड, बीएड. स्टुडंटस असोसिएशन