Due to famine during the famine - the merchants used the merchandise | दुष्काळात डाळींचे भाव कडाडले -: व्यापारीच मालामाल
दुष्काळात डाळींचे भाव कडाडले -: व्यापारीच मालामाल

ठळक मुद्देदीड महिन्यात क्विंटलला दीड ते दोन हजाराने वाढ

सांगली : डाळींचे भाव कडाडल्याने ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे. दीड महिन्यातच क्विंटलमागे दीड ते दोन हजार रुपयांची वाढ झाली असून या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना न होता व्यापारीच मालामाल झाल्याचे दिसत आहे. तूर, मूग आणि हरभरा डाळ यांच्या दराचा आलेख ऐन दुष्काळातच वाढत चालला आहे.

महागाई दिवसेंदिवस वाढत असताना आता पुन्हा डाळींचे भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे किचनमधील बजेट कोलमडणार असल्याचे चित्र दिसत आहे. तुरीचे पीक फेब्रुवारीच्या दुसºया आठवड्यात आले. तूरडाळ एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारात मुबलक प्रमाणात विक्रीस आली, तेव्हा ठोक बाजारात प्रतिकिलो ५० ते ६० रुपये भावाने विक्री झाली. दीड महिन्यातच प्रतिकिलोचे भाव ८० ते ९० रुपयांवर पोहोचले आहे. कमी पावसामुळे यावर्षी तुरीचे पीक कमी येण्याचा कृषी तज्ज्ञांचा अंदाज होता. सर्व बाबी हेरून व्यापाऱ्यांनी डाळींचे भाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तूरडाळ पुन्हा शंभर रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

तीन वर्षांपूर्वी तूरडाळीचे भाव प्रतिकिलो १७० रुपयांपर्यंत पोहोचले होते. वाढीव भावामुळे दुष्काळामध्ये सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. भाव सामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले होते. शिवाय आयातही सुरू केली होती. दोन वर्षापूर्वी तुरीचे उत्पादन जास्त झाल्यामुळेही डाळींचे दर उतरले होते. यावर्षी पुन्हा पीक कमी झाले आहे. वाढत्या मागणीमुळे भाव पुन्हा वाढले आहेत. बाजारात मुगाचे भाव वाढू लागले आहेत. सध्या मूग डाळ ७५०० ते ८००० रुपये डाळीचा क्विंटलचा भाव आहे. किरकोळ मूगडाळीची विक्री ८० ते ८२ रुपये प्रतिकिलो झाली आहे. हरभºयाचे उत्पादन कमी झाल्याने त्याचेही भाव वाढत आहेत.

हरभरा ३८०० ते ४००० रुपये क्विंटल असा भाव आहे. हरभरा डाळ ५७०० ते ६५०० रुपये क्विंटल असा दर असून, त्यामध्ये तीनशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली. हरभरा डाळीची किरकोळ विक्री ५५ ते ७० रुपये किलो झाली आहे. तूरडाळ ८००० ते ९००० रुपये क्विंटल झाली असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.

 


सांगलीमार्केट यार्डातील डाळींचे दर (प्रतिकिलो)
डाळ एप्रिल २०१९ मे २०१९
तूर ७० ते ७४ ८० ते ९०
हरभरा ५० ते ५२ ५७ ते ६५
मूग ६५ ते ७० ७५ ते ८०
मटकी ७२ ते ७५ ८५ ते ८७
मसूर ५० ते ५२ ५४ ते ५५
उडीद ५२ ते ५४ ६० ते ७५


Web Title: Due to famine during the famine - the merchants used the merchandise
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.