लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यातील १६८ गावे आणि १,२७१ वाड्या-वस्त्यांवरील तीन लाख ८५ हजार ४६८ नागरिकांची तहान १७२ टँकरद्वारे भागविली जात आहे. जत तालुक्यात टँकर भरण्यासाठीही पुरेस पाणी मिळत नसल्याच्या टँकर चालकांच्या तक्रारी आहेत. टंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढत असून पाण्याबरोबरच पशुधनाच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.दुष्काळ किंवा टंचाई जणू काही जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, कडेगाव, मिरज पूर्व तालुक्यांच्या पाचवीलाच पूजलेली असावी, असे चित्र आहे. गावोगावी खासगी पाण्याच्या टँकरची चलती आहे. शुद्ध पाणी मिळत नाही म्हणून नागरिक पाणी विकत घेतात. काही गावांतील पाणीपुरवठ्याच्या योजना ३० ते ३५ वर्षे जुन्या झाल्या आहेत. दुरुस्ती किंवा नव्या योजनांची कामे वेळेत सुरू होत नाहीत. पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार पाणीटंचाईचे एक कारण मानले जाते. दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या ताकारी, टेंभू, म्हैसाळ उपसा सिंचन योजना कधी पूर्ण होणार, याची कोणीच खात्री देऊ शकत नाही. चांदोली धरणापासून जवळ असणाऱ्या शिराळा तालुक्यातील दुरंदेवाडी, माधळगाव, खराळे-चिंचेवाडीतही टंचाई असल्यामुळे तेथे टँकर सुरू करावे लागले.जिल्ह्यातील २८ लाख २० हजार ५७५ लोकसंख्येपैकी तीन लाख ८५ हजार ४६८ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. जलयुक्त शिवार योजनेतील कामे झाल्याचे अधिकारी कागदोपत्रीच दाखवत आहेत. पण, त्या योजनांमध्ये पाणीच साठत नसल्यामुळे तेथील गावांमध्येही जिल्हा प्रशासनाला टँकर सुरू करावे लागले आहेत. ८२ पाझर तलावांमध्ये केवळ ९ टक्केच पाणीसाठा असल्यामुळे नागरिकांसाठी आणि पशुधनासाठी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये टँकर भरण्यासाठीही पाणी नसल्यामुळे टँकर चालकांना वीस ते तीस किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. जत तालुक्यातील १२३ गावांपैकी ८४ गावे आणि ७८० वाड्या-वस्त्यांवरील दोन लाख २४ हजार ९३ हजार लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्वाधिक टँकर जत तालुक्यात आहेत.जिल्ह्यातील गावे आणि टँकरने पाणी पुरवठातालुकागावेवाड्यालोकसंख्याटँकरजत८४७८०२२४०९३९५क़महांकाळ२०१०४३४०६४१६तासगाव१८१९३५१२९२२०खानापूर१८३५३७६१५१७आटपाडी२६१५५३४९६८२१शिराळा२४१४३६३एकूण१६८१२७१३८३४६८१६८जलयुक्त शिवार योजनेतील गावातही आता टँकरने पाणीजलयुक्त शिवार अभियानामध्ये २०१५-१६ वर्षात जिल्ह्यातील १४१ गावांत ३७८६ कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी ३४४६ कामे पूर्ण झाली. येथील जलसंधारणाच्या प्रकल्पामध्ये ३९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा करण्याचे उद्दिष्ट होते. २०१६-१७ मध्ये १४० गावांची निवड केली होती. साखळी सिमेंट बंधारे, सिमेंट बंधारे दुरुस्ती, कंपार्टमेंट बंडिंग, सलग समतल चर आदी २१० कामांवर १५ कोटींचा निधी खर्च झाला आहे. येथील कामांमध्ये ८० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा करण्याचे शासकीय यंत्रणेचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात जलसंधारणाची कामेही झाली आणि ११५ कोटींचा निधी खर्च झाला. मात्र आता जलयुक्त शिवारमधील गावांमध्ये शेतीला सोडा, पण प्यायलाही पुरेसे पाणी नाही. सर्वच गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. याचाच अर्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जलयुक्त शिवार योजनेतून टँकरमुक्त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न पूर्ण होणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्ह्यात पावणेदोनशे टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा
By admin | Updated: May 19, 2017 23:43 IST