दारू पिऊन आला अन् निलंबित झाला!
By Admin | Updated: September 15, 2014 23:47 IST2014-09-15T23:46:03+5:302014-09-15T23:47:53+5:30
पोलीसप्रमुखांचा दणका : आटपाडीच्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई

दारू पिऊन आला अन् निलंबित झाला!
सांगली : कर्तव्यात कसूर, असभ्य वर्तन व सातत्याने दारू पिऊन ड्यूटीवर येणारे आटपाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक हरी काळे यांना निलंबित करण्यात आले. वर्तणुकीत सुधारणा करावी, अशी ताकीद देण्यासाठी काळेंना जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी आज, सोमवारी स्वत:च्या कार्यालयात बोलावले होते. मात्र, काळे यावेळीही दारू पिऊन आल्याने सावंत यांना त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावा लागला.
काळे यापूर्वी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. त्यानंतर त्यांची पोलीस मुख्यालयातील जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली होती. ते नेहमी दारू पिऊन ड्यूटीवर येत असत. सावंत यांनी त्यांना दोन-तीनवेळा ताकीदही दिली होती. तथापि, त्यांच्या वर्तणुकीत काहीच फरक पडला नाही. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी त्यांची आटपाडी पोलीस ठाण्याकडे बदली करण्यात आली होती. तेथेही त्यांनी असभ्य वर्तन केल्याने सावंत यांनी आज, सोमवारी त्यांना शेवटची ताकीद देण्यासाठी बोलावले होते. दुपारी साडेबारा वाजता काळे पोलीस मुख्यालयात आले. सावंत यांना भेटण्यासाठी ते कार्यालयात गेले. मात्र, यावेळीही ते दारू पिऊन आल्याचे दिसून आल्याने सावंत यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले.
सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दुपारी दीड वाजता त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना निलंबित केल्याचा आदेश जारी करून त्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सहा महिन्यांपूर्वीही एक हवालदार दारू पिऊन सावंत यांना भेटण्यासाठी गेला होता. त्यालाही त्यांनी निलंबित केले होते. (प्रतिनिधी)
अशोभनीय कृत्य
सावंत म्हणाले की, दारू पिऊन ड्यूटीवर येणे, हे अधिकाऱ्यांच्यादृष्टीने अशोभनीय आहे. दारू पिऊन ड्यूटीवर कोणी येत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही. मग तो अधिकारी असो किंवा कर्मचारी. पोलीस दलात अशा प्रतिमेचे अधिकारी असतील, तर जनमाणसांत चुकीचा संदेश जाऊ शकतो. पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो.