इतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन: डॉ. श्रीमंत कोकाटे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 03:01 PM2021-09-23T15:01:09+5:302021-09-23T15:01:45+5:30

हौसाक्का यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे आणि ब्रिटीशांचे जुलमी राज्य नष्ट व्हावे, यासाठी निर्भीडपणे लढा उभारला.

dr shrimant kokate says hausabai patil was the revolutionary link between history and the present merges into infinity | इतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन: डॉ. श्रीमंत कोकाटे

इतिहास आणि वर्तमानाचा क्रांतिकारक दुवा अनंतात विलीन: डॉ. श्रीमंत कोकाटे

Next

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का पाटील यांचे आज वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा इतिहास आपल्या सर्वांना ज्ञात आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या कन्या हौसाक्का पाटील यांनी देखील स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यलढ्यासाठी आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सामाजिक-सांस्कृतिक लढ्यासाठी समर्पित केले.

हौसाक्का पाटील या चार वर्षाच्या असताना त्यांच्या मातेचे निधन झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी दुसरा विवाह न करता आपली मुलगी हाच खरा आपल्या वंशाचा दिवा आहे, असे म्हणून त्यांना सांभाळले. चिमुकल्या वयामध्ये हौसाक्कानी हातात तिरंगा घेऊन त्या ब्रिटिशांच्याविरुद्ध रस्त्यावरती आल्या. त्यांची जडणघडण करण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांना वेळ मिळाला नाही, परंतु ज्या पद्धतीने पाण्यातील माशाला पोहायला शिकवायची गरज नसते, तसे क्रांतिकारकांच्या मुलांना कोणत्याही बाह्य शिक्षणाची गरज नसते.

हौसाक्का यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे आणि ब्रिटीशांचे जुलमी राज्य नष्ट व्हावे, यासाठी निर्भीडपणे लढा उभारला. सुरलीच्या घाटात ब्रिटीशांच्या गाडीवरती छापा टाकला. वांगी या ठिकाणचा ब्रिटिशांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातला. भवानीनगर रेल्वे स्थानकावरती इंग्रजांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी वेषांतर करून त्यांनी योजना आखली आणि ती योजना त्यांनी यशस्वी करून दाखविली. गोवा स्वतंत्र व्हावा यासाठी त्या मांडवी नदी पार करून पणजी या ठिकाणी पोहोचल्या. छत्रपती संभाजीराजानंतर मांडवी नदी पार करण्याचे सामर्थ्य हौसाक्का पाटील यांच्यामध्ये होते.

पुरुषाप्रमाणे स्त्रियादेखील हिंमतवान, निर्भीड, लढवय्या आणि महाबुद्धिमान असतात हे  हौसाक्कांनी दाखवून दिले. हौसाक्कासारख्या अनेक स्वातंत्र्यविरामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हौसाक्का शांत बसल्या नाहीत. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनांमध्ये त्यांनी उडी घेतली. कष्टकरी, कामकरी, शेतकरी यांना न्याय मिळावा, यासाठी त्यात सतत शासन व्यवस्थेविरुद्ध लढत राहिल्या. राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, स्वातंत्र्य मिळावे यासाठी त्या सतत संघर्ष करत राहिल्या.

फडणवीस सरकारने पुरंदरेसारख्या विकृत व्यक्तीला महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिल्यानंतर हौसाक्का जिजाऊंच्या सन्मानासाठी चवताळून उठल्या. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये त्यांनी जाहीर सभेत पुरंदरेच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला विरोध केला. सांगली या ठिकाणी शिवसन्मान जागर परिषदेमध्ये सनातन्यानी येऊन जितेंद्र आव्हाड व त्यांच्या सहकाऱ्यावर हल्ला केला, त्यावेळेस त्याच कार्यक्रमात हातात काठी घेऊन त्या सनातन्यांच्या विरुद्ध उभ्या राहिल्या.

हौसाक्का पाटील यांची हिंमत, निर्भीडपणा, स्वाभिमान, बाणेदारपणा, तळमळ, संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहील. हौसाक्का पाटील या केवळ क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या आणि भाई भगवानराव मोरे पाटील यांच्या पत्नी एवढीच त्यांची मर्यादित ओळख नाही, तर त्या देखील स्वतः शूर, निर्भीड आणि महान स्वातंत्र्य सेनानी आहेत.

हौसाक्का पाटील यांना अनेक वेळा तुरुंगवास झाला. इंग्रजांनी त्यांच्या घरावरती अनेक वेळा छापा टाकला. बालपणापासून हौसाक्का यांना संघर्षाला सामोरे जावे लागले. स्वातंत्र्यानंतर देखील अनेक आंदोलनांमध्ये त्यांना तुरुंगवास झाला. पण त्या डगमगल्या नाहीत, हतबल झाल्या नाहीत, निराश झाल्या नाहीत. संकतासमयी त्या लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या.

हौसाक्का पाटील यांना प्रदीर्घ आयुष्य लाभले. त्यांच्या मुलांनी, सुनांनी, नातवंडांनी त्यांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपले. त्यामुळे त्यांना प्रदीर्घ आयुष्य लाभले. हौसाक्का पाटील या स्वातंत्र्यासाठी लढल्या. आज एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरती त्या अनंतात विलीन झाल्या. इतिहास पाहिलेल्या, इतिहास घडवलेल्या आणि वर्तमानाला प्रेरणा देणाऱ्या त्या ऐतिहासिक महामानव आहेत. आज त्यांचे दुःखद निधन झाले. ही वार्ता आपल्या सर्वांना व्यथित करणारी आहे.

आम्ही  हौसाक्का पाटील यांना अनेक वेळा भेटायला जायचो. कारण त्या एक ऐतिहासिक व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेणे, त्यांना पाहिल्यानंतर प्रेरणा मिळत असे. त्या इतिहासातील महामानव आहेत तर वर्तमानातील दीपस्तंभ आहेत .त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, या शब्दांत डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Web Title: dr shrimant kokate says hausabai patil was the revolutionary link between history and the present merges into infinity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :Sangliसांगली