दाभोलकर खटल्याच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार, अंनिसचा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय
By संतोष भिसे | Updated: June 11, 2024 16:46 IST2024-06-11T16:45:40+5:302024-06-11T16:46:53+5:30
आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांसाठी वधू वर सूचक केंद्र सुरू करणार

दाभोलकर खटल्याच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देणार, अंनिसचा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय
सांगली : आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांसाठी वधू वर सूचक केंद्र सुरू करण्याचा तसेच दाभोलकर खटल्याच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतला आहे. अंनिसच्या सोलापुरातील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय झाला. या माध्यमातून जाती निर्मूलनाच्या दिशेने अंनिसने पाऊल टाकले आहे.
बैठकीला १९ जिल्ह्यांतून कार्याध्यक्ष, प्रधान सचिव, राज्य विभागांचे कार्यवाह, कार्यकारिणीचे सदस्य, सल्लागार मंडळाचे सदस्य आणि क्रियाशील कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीतील अन्य निर्णय असे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून खटल्याच्या निकालाबाबत मुंबई उच्च न्यायालयात अपील करणे, निकालाचा मराठी अनुवाद करून लोकांपर्यंत पोहोचवणे. २० जून ते २० ऑगस्टदरम्यान 'नरेंद्र दाभोलकर यांचे विचार घरोघरी' अभियान राबविणे, दाभोलकरांच्या १५ पुस्तिका प्रकाशित करून त्याच्या ६० हजार प्रती वितरित करणे, धार्मिक स्थळांवर दैवी उपचार घेणाऱ्या मानसिक रोग्यांसाठी 'दवा आणि दुवा प्रकल्प' सुरू करणे, २०२४ हे वर्ष 'प. रा. आर्डे प्रबोधन प्रशिक्षण वर्ष' जाहीर करणे.
बैठकीत डॉ. हमीद दाभोलकर आणि राहुल थोरात यांनी सहा महिन्यांच्या कामाचा आढावा घेतला. बैठकीला मिलिंद देशमुख, मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, सम्राट हटकर, विनोद वायंगणकर, रामभाऊ डोंगरे, नंदिनी जाधव, प्रा. अशोक कदम, मुंजाजी कांबळे, प्रशांत पोतदार, फारुख गवंडी, प्रकाश घादगिने, निळकंठ जिरगे आदी उपस्थित होते.