डॉ. माधव मुतालिक यांचे निधन; संगीत, साहित्य आणि वैद्यकीय क्षेत्रात होती प्रभावी कामगिरी
By संतोष भिसे | Updated: June 12, 2025 19:44 IST2025-06-12T19:41:56+5:302025-06-12T19:44:39+5:30
संतोष भिसे सांगली : 'भूले बिसरे गीत', 'इथे गाणी भेटतात' असे एका पेक्षा एक सरस हिंदी व मराठी चित्रपट ...

डॉ. माधव मुतालिक यांचे निधन; संगीत, साहित्य आणि वैद्यकीय क्षेत्रात होती प्रभावी कामगिरी
संतोष भिसे
सांगली : 'भूले बिसरे गीत', 'इथे गाणी भेटतात' असे एका पेक्षा एक सरस हिंदी व मराठी चित्रपट गीतांचे कार्यक्रम निर्माण करून ते संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय करणारे 'सप्तक सारेगम' या संस्थेचे एक संस्थापक सदस्य, ज्येष्ठ निवेदक आणि वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या नावाची मोहोर उमटवणारे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक डॉ. माधव मुतालिक यांचे श्वसनविकाराने भोपाळ येथे गुरुवार दि.१२जून २०२५ रोजी पहाटे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले.
मिरज वैद्यकीय महाविद्यालयात अधिव्याख्याता म्हणून काही काळ काम केल्यानंतर, बुधगाव येथील वसंतदादा दंत महाविद्यालय, पुणे येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज त्याचबरोबर मॉरिशस मधील सेशल्स येथील वैद्यकीय इन्स्टिट्यूट मध्ये ज्ञानदानाची प्रभावी कामगिरी करत डॉ. माधव मुतालिक यांनी अनेक विद्यार्थी घडविले होते. सध्या ते भोपाळ येथील रामकृष्ण मेडिकल कॉलेज मध्ये विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.
'माझे तसे ठीक चालले आहे'हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित होता. याच नावाने त्यांच्या स्वतःच्या कवितांच्या वाचनाचा एक स्वतंत्र कार्यक्रम डॉ.माधव मुतालिक व त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता मुतालिक अतिशय प्रभावीपणे सादर करत असत. जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर तसेच मराठी भावगीतांच्या कार्यक्रमांचे अतिशय ओघवत्या भाषेत, प्रभावी निवेदन करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई असा परिवार आहे.