डबल महाराष्ट्र केसरी खेडकर यांचे निधन
By Admin | Updated: July 5, 2014 00:26 IST2014-07-05T00:23:30+5:302014-07-05T00:26:11+5:30
महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील एक ऐतिहासिक वादळ शांत झाले

डबल महाराष्ट्र केसरी खेडकर यांचे निधन
इस्लामपूर/जुनेखेड : नवेखेड (ता. वाळवा) येथील सुपुत्र व महाराष्ट्राचे पहिले डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव गोपाळा चव्हाण ऊर्फ गणपतराव खेडकर पैलवान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी इस्लामपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज, शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील एक ऐतिहासिक वादळ शांत झाले.
गेल्या १0 वर्षांपासून गणपतराव खेडकर हे मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होते. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्यावर बेळगाव येथे हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली होती. आज सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने इस्लामपूरमधील खासगी रुग्णालयात साडेदहाच्या सुमारास दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरु असताना त्यांचे साडेबाराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी गीतांजली, मुले नेताजी व राजन, मुलगी शुभांगी यांच्यासह भाऊ वासुदेव चव्हाण असा परिवार आहे.
खेडकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या जन्मगावी नवेखेड येथे शोककळा पसरली होती. सायंकाळी गावातून पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. सायंकाळी सहा वाजता कृष्णा नदी तिरावरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, भीमराव माने, पी. आर. पाटील, राहुल महाडिक, बाळासाहेब वाठारकर, विकास पाटील, उद्योगपती उत्तमराव फडतरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)