रेखांकन बदल नको, शक्तिपीठ महामार्गच रद्द करा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 18:08 IST2026-02-15T18:07:49+5:302026-02-15T18:08:00+5:30

बुधगावहून २३ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा

Don't change the design, just cancel the Shaktipeeth highway! | रेखांकन बदल नको, शक्तिपीठ महामार्गच रद्द करा !

रेखांकन बदल नको, शक्तिपीठ महामार्गच रद्द करा !

सांगली : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीतर्फे नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी दि. २३ फेब्रुवारीला बुधगाव (ता. मिरज) येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढण्याचा निर्णय सांगलीत संघटना आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

अखिल भारतीय किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले, नागपूर–गोवा शक्तिपीठ महामार्ग हा जिल्ह्यातील एकोणीस गावांमधून जाणार असून, बाधित गावांतील बहुतांश शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे. शासनाकडून महामार्गाचे रेखांकन बदलण्याची घोषणा केली आहे. परंतु, रेखांकन बदलून प्रश्न सुटणार नाही; समांतर महामार्ग असताना नव्या महामार्गाची गरजच नाही. शक्तिपीठ महामार्ग खानापूर, कडेगाव आणि वाळवा तालुक्यांतून नेण्याचा शासनाचे प्रयत्न चालू आहेत.

मात्र, या भागातील बहुतांश जमीन बागायती असल्याने तेथील शेतकरीही मोठ्या अडचणीत येतील, असे समितीचे म्हणणे आहे. बैठकीस कॉम्रेड उमेश देशमुख, सतीश साखळकर, दिगंबर कांबळे, प्रवीण पाटील, उमेश एडके, यशवंत हारुगडे, दिनकर पाटील, श्रीकांत पाटील, संभाजी पाटील, सुधाकर पाटील, घनश्याम नलावडे, हनमंत सावंत, गजानन सावंत, भूषण गुरव, बाळासाहेब पाटील, अधिक पाटील, विजय पाटील, अनिल कोकाटे, अजिंक्य पाटील, सुनील पाटील, प्रभाकर तोडकर, सुनील पवार, आदी उपस्थित होते.

संभाव्य महापुराचा धोका टळणार नाही : सतीश साखळकर

रेखांकन बदलले तरी बागायती जमिनी अधिग्रहित होणारच आहेत. अनेक ठिकाणी शेतीच्या मधोमध महामार्ग गेल्यास जमिनीचे दोन भाग होतील, सिंचन व्यवस्था विस्कळीत होईल आणि उत्पादनावर परिणाम होईल. तसेच संभाव्य महापुराचा धोका टळणार नाही, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली. “एका भागातील रेखांकन बदलले तरी दुसऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार,” असे नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर म्हणाले.

Web Title: Don't change the design, just cancel the Shaktipeeth highway!