कंपन्यांची दुकाने भरण्यासाठी पीकविमा काढायचा काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:27 AM2021-07-30T04:27:47+5:302021-07-30T04:27:47+5:30

संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पीकविम्याचे परतावे मिळत नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे, त्यामुळे यावर्षी विम्याचा हप्ता भरण्याविषयी शेतकऱ्यांत ...

Do you want to take out crop insurance to cover companies' shops? | कंपन्यांची दुकाने भरण्यासाठी पीकविमा काढायचा काय?

कंपन्यांची दुकाने भरण्यासाठी पीकविमा काढायचा काय?

Next

संतोष भिसे-लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पीकविम्याचे परतावे मिळत नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे, त्यामुळे यावर्षी विम्याचा हप्ता भरण्याविषयी शेतकऱ्यांत निरुत्साह दिसत आहे. जुलै संपत आला तरी १५ हजार शेतकऱ्यांनीच लाभ घेतला आहे.

शेतकऱ्यांनी विमा घ्यावा यासाठी शासनाने दोन ते तीनवेळा मुदत वाढविली. २३ जुलैची अंतिम मुदत ३० जुलै केली, तरीही पुरेसा प्रतिसाद नाही. विम्याचे हप्ते भरले तरी नुकसान भरपाई देताना कंपन्या फसवेगिरी करतात, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. भरपाई देताना पन्नास त्रुटी काढल्या जातात. भरपाई मिळूच नये यासाठी अडथळे आणले जातात. या स्थितीत कंपन्यांची दुकाने भरण्यासाठी पीकविमा काढायचा काय, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

पॉईंटर्स

जिल्ह्यातील एकूण शेतकरी - ५ लाख ३६ हजार

गेल्या वर्षी विमा काढलेेले शेतकरी - ३७,०००

यावर्षी विमा काढलेले शेतकरी १५,०००

एकूण खरीप क्षेत्र (हेक्टरमध्ये)

भात १७,४००, ज्वारी ५० हजार ६००, बाजरी ५६,०००, मका ३७,१००, सोयाबीन ५९,०००, भुईमूग ३२,२००, ऊस १,०४,२१, तूर ८,२००, मूग ७,७००, उडीद १३,६००.

बॉक्स

यंदा अत्यल्प विमा

यावर्षी शासनाने वारंवार मुदतवाढ देऊनही अवघ्या १५ हजार शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. विमा कंपन्यांकडून फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरवली आहे. आजवर विम्यासाठी भरलेले पैसे वाया गेल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

कोट

विमा कंपन्या चुना लावतात

पीकविमा म्हणजे कंपन्यांसाठी शासनाने तयार केलेले कुरण आहे. २०१९ मध्ये विम्याचा हप्ता भरला होता, पण अतिवृष्टीमुळे पीक हातचे गेले. कंपनीने अनेक त्रुटी काढत नुकसान भरपाई नाकारली, त्यामुळे यावर्षी विम्याचा हप्ता भरला नाही.

- महादेव कोरे, शेतकरी, मिरज

पूर आल्यानंतर ७२ तासांच्या आता नुकसानीचे फोटो पाठवावेत असे कंपनी सांगते, पण पुराचे पाणी रानातून १० ते १५ दिवस हटत नाही, हे कंपनीला पटत नाही. भरपाईचा दावा फेटाळला जातो. या स्थितीत विम्यासाठी पैसे न भरलेलेच चांगले ,अशी मानसिकता होते. कंपन्यांचा अनुभव चांगला नाही.

- कमलेश्वर कांबळे, शेतकरी, वड्डी

शेतकरी विम्याचे हप्ते भरत आहेत. पावसात अडकलेल्या शेतकऱ्यांना संधी मिळावी म्हणून अंतिम मुदत वेळोवेळी वाढवली आहे. सध्या ती शुक्रवारपर्यंत (दि. ३०) आहे. शेतकऱ्यांची नावे पोर्टलवर अपलोड करण्याचे काम अद्याप सुरू आहे.

- बसवराज मास्तोळी, कृषी अधीक्षक, सांगली.

Web Title: Do you want to take out crop insurance to cover companies' shops?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.