दारूबंदीवरून तू तू-मै मै
By Admin | Updated: September 16, 2014 23:55 IST2014-09-16T22:54:38+5:302014-09-16T23:55:00+5:30
कासेगावात प्रकार : सत्ताधारी-विरोधक भिडले

दारूबंदीवरून तू तू-मै मै
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथील दारूबंदी ठरावाबाबत विरोधक व सत्ताधारी गटात सध्या तू- तू मै-मै सुरु आहे. ठरावासाठी विरोधी गट आग्रही असून सत्ताधारी प्रतिसाद देत नसल्याची त्यांची तक्रार आहे. सरपंच सौ. नंदाताई पाटील यांची दारूबंदी ठरावाबाबतची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात असल्याने ग्रामस्थांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कासेगावात काही दिवसांपासून दारूबंदीबाबत आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापले आहे. सरपंच सौ. नंदाताई पाटील यांनी केलेल्या आरोपांना विरोधकांनीही तितक्याच आक्रमकपणे उत्तरे दिली आहेत. विरोधकांनी दारूबंदीबाबत घेतलेली आग्रही गावातील समस्यांबाबत घेतलेल्या संघर्षाच्या पवित्र्याची ग्रामस्थांत चर्चा सुरु आहे.
राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या या गावात दारुबंदीबाबत विरोधी गटाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. वेळोवेळी यावर ग्रामसभांमधून गरमागरम चर्चा झाल्या आहेत. सत्ताधारी गटही दारुबंदीसाठी अनुकूलता दाखवत असला तरी, चर्चेपलीकडे यावर ठोस निर्णय मात्र त्यांना घेता आलेला नाही. त्यामुळे लोकांत नाराजी असून याचाच फायदा घेणे विरोधी गटाकडून सुरु आहे. त्यामुळे अगदी गनिमीकाव्याने त्यांचे दारुबंदीचे काम सुरु आहे. सत्ताधारी गट मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे विरोधकांचा ‘एकला चलो रे’ असा कार्यक्रम सुरु आहे. विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर असल्याने विरोधकांनी मात्र प्रचाराआधीच गावातील राजकीय वातावरण तापवले आहे. (वार्ताहर)
सत्ताधारी गट गेल्या कित्येक वर्षांपासून दारूबंदी ठरावाबाबत चालढकल करत आहे. दारूबंदीअगोदर समाजाचे प्रबोधन करायचे, असा फक्त उपदेशच त्यांच्याकडून सुरु असून, आतापर्यंत त्यांनी किती समाजप्रबोधन केले, किती व्याख्याने आयोजित केली, याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्यांच्याकडूनच राजकीय फार्स सुरु असून, विरोधक दारुबंदी केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.
- भिकशेठ तोडकर, संचालक,
शिवाजी केन प्रोसेसर्स, शिराळा.