गुन्हेगारांना पकडू नका, फक्त त्यांची माहिती द्या!

By Admin | Updated: July 8, 2014 00:49 IST2014-07-08T00:48:46+5:302014-07-08T00:49:56+5:30

दिलीप सावंत : ‘रिक्षावाला खबरी’ उपक्रमास सांगलीत प्रारंभ

Do not catch the criminals, only inform them! | गुन्हेगारांना पकडू नका, फक्त त्यांची माहिती द्या!

गुन्हेगारांना पकडू नका, फक्त त्यांची माहिती द्या!

सांगली : रस्त्यावर तुम्ही व्यवसायानिमित्ताने २४ तास असता, कुठे काय घडले आहे, याची माहिती तुम्हाला असते. अगदी एखादी घटना तुमच्यासमोरही घडते. घटना होताना शेकडोजण पहात उभे असतात मात्र पोलिसांना कोणी कळवत नाही. यामुळे गुन्हेगारी फोफावत आहे. तुम्ही गुन्हेगारांना पकडू नका, केवळ आम्हाला माहिती द्या, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी सांगली, मिरजेतील रिक्षाचालकांना केले आहे.
घरफोडी, साखळी चोरी या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तसेच रस्त्यावर होणाऱ्या गुन्ह्यांची माहिती रिक्षाचालकांना पटकन समजते. त्यांची मदत झाली, तर गुन्हेगारीला आळा बसू शकतो, असा विचार करून सावंत यांनी रिक्षाचालकांना खबरी म्हणून घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याची सुरुवात आजपासून (सोमवार) सुरू झाली. यानिमित्त पोलीस मुख्यालयात बैठक झाली. त्यावेळी सावंत बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, बजरंग बनसोडे, निरीक्षक संजय गोर्ले, रिक्षाचालक महादेव पवार, फिरोज मुल्ला, शाहीर खराडे, अरुण धनवडे उपस्थित होते.
सावंत म्हणाले, रिक्षाचालकांना कोणत्या चौकात काय भानगडी सुरू आहेत, याची माहिती असते. महिलांच्या गळ्यातील दागिने भरदिवसा हिसडा मारुन लंपास केले जातात. उद्या तुमच्या घरातील महिलांवर असा प्रसंग येऊ शकतो. दागिने लंपास करणारे गुन्हेगार नंबरप्लेट नसलेल्या वाहनांचा वापर करतात, अशी नंबर प्लेट नसलेली वाहने दिसून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. रस्त्यावर चालणाऱ्या सर्व प्रकारच्या गुन्हेगारीची माहिती द्यावी. मात्र घटना घडत असताना आम्ही तिथे नसतो. तुम्ही असता. यामुळे तुमची मदत हवीय. चांगले काम करणाऱ्या रिक्षाचालकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येईल. (प्रतिनिधी)

Web Title: Do not catch the criminals, only inform them!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.