विभागीय सहनिबंधकांचे आदेश : जिल्हा बँकेतील ८२ कोटींच्या खर्चाची होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 23:09 IST2025-11-24T23:08:44+5:302025-11-24T23:09:13+5:30
आजी-माजी संचालकांसह तत्कालीन अधिकाऱ्यांना नोटीस...

विभागीय सहनिबंधकांचे आदेश : जिल्हा बँकेतील ८२ कोटींच्या खर्चाची होणार चौकशी
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरव्यवहारातील ८२ कोटींच्या वसुलीसाठी ३० एप्रिलअखेर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधकांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांना दिले आहेत. या प्रकरणी बँकेचे ३८ आजी-माजी संचालक, कार्यकारी संचालकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी दि. २६ नोव्हेंबर रोजी हजर राहण्याची नोटीस प्राधिकृत अधिकाऱ्यांनी बजावली आहे. या चौकशीनंतर पुढील कारवाई होणार असल्याचे सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली होती. तसेच स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनीही बँकेच्या कारभाराबाबत लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारीची ८८ अंतर्गत चौकशी चालू होती. या तक्रारीनुसार मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी केली. यामध्ये कर्ज वितरणात अनियमितता, फर्निचर खरेदीत अवाजवी दर आकारणी, वाढीव कामे करणे, सोसायटी संगणकीकृत करत असतानाचा करण्यात आलेला अनावश्यक खर्च, नोकर भरती, पात्रता नसताना नोकरांना वाढीव पगार अदा करणे, बँकेेने थकीत कर्जापोटी ताबा असलेल्या मालमत्ता खरेदी-विक्रीमध्ये विहित पद्धतीचा वापर न करता खरेदी आदी बाबींची चौकशी केली. या चौकशीमध्ये बँकेचे सुमारे ५० कोटी ५८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे आढळून आले होते. यामध्येही काही मुद्दे राहून गेले होते. त्यामध्ये विश्वकर्मा प्लायवूड यांच्याकडून करण्यात आलेल्या बेंच खरेदी, ३६ शाखा व मुख्यालयातील आयटी विभागात फर्निचर नूतनीकरण, २१ परिविक्षाधिन तांत्रिक कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पगारवाढ आणि वसंतदादा कारखान्याचा मद्यार्क प्रकल्प बँकेच्या ताब्यात असताना परस्पर भाडेतत्त्वावर चालवण्यास देणे या सहा मुद्द्यांमध्ये बँकेचे ३१ कोटी ३२ लाखांचे नुकसान झाले आहे. नव्याने ३१ कोटी ३२ लाख रुपये साहित्य खरेदीचीही चौकशी करण्यात येणार आहे.
बँकेच्या आजी-माजी संचालक मंडळाच्या काळात एकूण सुमारे ८२ कोटींचे नुकसान झाले असून, या बाबी चौकशीअंतर्गत समोर आल्या आहेत. बँकेला दोष दुरुस्ती अहवाल सादर करण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र, दुरुस्ती झालेली दिसून येत नाही. यामुळे सुमारे ८२ कोटींच्या नुकसानाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून उपनिबंधक सहकारी संस्थेचे बिपीन मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी दि. ३० एप्रिल २०२६ पर्यंत जबाबदारी निश्चितीचा अहवाल सादर करावा, असे आदेश विभागीय निबंधकांनी दिले आहेत.
चौकट
आजी-माजी संचालकांनी उद्यापर्यंत म्हणणे सादर करावे
गैरव्यवहारप्रकरणी जिल्हा बँकेचे ३८ आजी-माजी संचालक, कार्यकारी संचालकांनी आपले म्हणणे सादर करण्यासाठी दि. २६ नोव्हेंबर रोजी उपनिबंधक कार्यालयात स्वत: अथवा वकिलामार्फत आपले म्हणणे सादर करावे, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस बजावलेल्यांमध्ये विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष जयश्री पाटील, खासदार विशाल पाटील, आ. सत्यजित देशमुख, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार मोहनराव कदम, विक्रम सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, ॲड. चिमण डांगे, आदी ३८ जणांचा समावेश आहे.