जि. प.च्या शाळा खासगी शाळांकडून लक्ष्य
By Admin | Updated: September 2, 2015 23:39 IST2015-09-02T22:40:11+5:302015-09-02T23:39:08+5:30
मिरज परिसरातील चित्र : पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकांची कसरत

जि. प.च्या शाळा खासगी शाळांकडून लक्ष्य
संजय माने- टाकळी मिरज शहरातील खासगी शाळांनी पटसंख्या वाढीसाठी शैक्षणिक सुविधांच्या नावाखाली शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांना लक्ष्य केले आहे. परिणामी विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शासनाने वारेमाप मंजुरी दिल्याने सर्वत्र खासगी शाळांचे पेव फुटले आहे. पर्यायाने पटसंख्या वाढीसाठी स्पर्धा सुरू आहे. खासगी शाळांनी या स्पर्धेत टिकण्यासाठी वाहनांसह विविध शैक्षणिक सुविधा निर्माण केल्या आहेत. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पटसंख्येसाठी पळवापळवी सुरू केली आहे. मिरज शहरालगत टाकळी, बोलवाड, मल्लेवाडी, बेडग, म्हैसाळ, विजयनगर, वड्डी, ढवळी ही गावे अवघ्या पाच ते आठ किलोमीटरवर आहेत. या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांना त्याचा फटका बसत आहे. शैक्षणिक सुविधांचे आमिष दाखवत विद्यार्थ्यांना खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नाला पालकही बळी पडू लागले आहेत. पाल्यासाठी भरमसाट शुल्क देऊन शहरातील खासगी शाळेत प्रवेश घेत असल्याने ग्रामीण भागातील खासगी व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पटसंख्येवर परिणाम झाला आहे. दरवर्षी शहरातील खासगी शाळांकडून विद्यार्थी पळविण्याचे प्रयत्न होत असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. या शाळांमध्ये शैक्षणिक सुविधा देण्याबाबत शिक्षकांवर मर्यादा आहेत. दुसरीकडे आर्थिक परिस्थिती असणाऱ्या पालकांची शैक्षणिक सोयी-सुविधा असणाऱ्या खासगी शाळांकडे ओढ वाढल्याने त्याचा परिणाम जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्येवर होऊ लागला आहे.
जिल्हा परिषदेकडून तुटपुंज्या मिळणाऱ्या निधीत व इतर सोयी-सुविधांबाबत खासगी शाळांसोबत स्पर्धा करणे शक्य नाही. ग्रामीण भागातील पालकांच्या शैक्षणिक सुविधांबाबत अपेक्षा वाढल्या आहेत. सेमी इंग्रजी व संगणकीय शिक्षणाची जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुविधा नसल्याने पालकांचा खासगी शाळांकडे कल वाढला आहे. खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी, ई-लर्निंग यासह शैक्षणिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. अन्यथा या शाळा बेदखल ठरण्याची शक्यता आहे.
शिक्षकांची मुले खासगी शाळांत!
जिल्हा परिषदेच्या शाळांत कार्यरत असणाऱ्या काही शिक्षकांची मुलेही खासगी शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याची तक्रार आहे. याबाबत पालकांनी जाब विचारल्यास शिक्षक निरुत्तर होताना दिसतात.