जि. प. सदस्या छाया खरमाटे भाजपच्या वाटेवर
By Admin | Updated: August 10, 2015 00:55 IST2015-08-10T00:55:25+5:302015-08-10T00:55:25+5:30
राष्ट्रवादीशी फारकत : तासगाव तालुक्यात राजकीय उलथा-पालथ होण्याची चिन्हे

जि. प. सदस्या छाया खरमाटे भाजपच्या वाटेवर
दत्ता पाटील - तासगाव जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या माजी सभापती आणि विसापूर (ता. तासगाव) गटातील जिल्हा परिषद सदस्या छाया खरमाटे यांनी राष्ट्रवादीशी फारकत घेतली आहे. जिल्हा बँक, बाजार समिती निवडणुकीतील त्यांच्या भूमिकेबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. तासगाव तालुक्यात खरमाटेंच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. या चर्चेने तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय उलथा-पालथ होण्याची शक्यता आहे.गतवेळी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि खासदार संजय पाटील एकत्रित होते. तासगाव तालुक्यात सहा जिल्हा परिषद गटांपैकी मणेराजुरीच अपवाद वगळता सर्वच जिल्हा परिषद सदस्या आणि पंचायत समितीचे सदस्य हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले होते, तर मणेराजुरी जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद सदस्या आणि दोन पंचायत समिती सदस्यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केली होती. नंतर या सदस्यांनी राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारल होते. विसापूर जिल्हा परिषद गटातून आर. आर. पाटील समर्थक छाया खरमाटे जिल्हा परिषद सदस्या म्हणून, तर याच गटातून आर. आर. पाटील समर्थक सुनीता पाटील या बोरगाव गणातून, तर खासदार संजयकाका पाटील समर्थक जयश्री माने या विसापूर गणातून निवडून आल्या होत्या. त्यावेळी आर. आर. पाटील यांचे समर्थकांनी छाया खरमाटेंविरोधात बंडखोरीही केली होती. त्यामुळे विसापूर जिल्हा परिषद गट विशेष चर्चेत आला होता. आर. आर. पाटील यांनी छाया खरमाटे यांना समाजकल्याणच्या सभापतीपदी संधी दिलेली होती. तालुक्यातील राजकारणातही त्यांचा सक्रिय सहभाग होता; मात्र पाटील यांच्या निधनानंतर खरमाटे यांची राष्ट्रवादीशी दरी रुंदावली. नुकत्याच झालेल्या जिल्हा बँक आणि तासगाव बाजार समिती निवडणुकीतही खरमाटे दिसून आल्या नाहीत. किंबहूना राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्याची दखल घेतली नाही.
नेत्यांची खासगीत कबुली
जिल्हा बँक आणि बाजार समिती निवडणुकीत खरमाटेंनी भाजपच्या सोयीची भूमिका घेतल्याची चर्चाही राष्ट्रवादीच्या वर्तुळात आहे. खरमाटेंनी अद्याप राजकीय भूमिका जाहीर केली नसली, तरी गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीशी फारकत घेऊन भाजपशी जवळीक साधल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेते खासगीत याबाबतची कबुली देत आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीत आमच्या कामाची दखल घेत आबांनी संधी दिली होती. त्यावेळी आमच्याविरोधात एका गटाने बंडखोरी केली होती. आता याच गटाला पदे दिली जात आहेत. आबांनी ज्यांना झिडकारले होते, त्यांनाच पदे देण्याचे काम सध्याच्या नेतृत्वाकडून होत आहे. ते आम्हाला मान्य नाही. आबांशी निष्ठा असणाऱ्यांचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केले जात आहे. आमचे राजकारण स्वाभिमानाचे आहे. लाचारीच्या राजकारणामुळे तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप प्रवेशाचा विचार केलेला नाही; मात्र येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांशी चर्चा करून राजकीय निर्णय घेतला जाईल.
- छाया खरमाटे, जिल्हा परिषद सदस्या, राष्ट्रवादी.
आर. आर. पाटील यांनी छाया खरमाटे यांना नेहमीच झुकते माप दिले होते. विसापूर गटात एका गटाचा विरोध असतानादेखील त्यांना उमेदवारी दिली होती. समाजकल्याण सभापतीपदावर संधी दिली होती. आबांनी एवढी पदे दिल्यानंतरही त्यांना सत्तेची हाव आहे. जिल्हा बँक आणि बाजार समिती निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादीचे काम केले नाही. भाजपकडे मात्र त्यांचा कल दिसून येत आहेत. कोणाच्या पक्ष सोडण्याने पक्षाला फरक पडणार नाही.
-संभाजी पाटील, राष्ट्रवादी, बोरगाव