उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत पळापळ
By Admin | Updated: March 22, 2017 23:36 IST2017-03-22T23:36:17+5:302017-03-22T23:36:17+5:30
वसुली मोहीम गतीने : नोटाबंदीच्या फटक्यानंतरही जोश कायम, नफ्याचा विक्रम कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर

उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत पळापळ
सांगली : नोटाबंदीच्या काळात लादले गेलेले निर्बंध आणि थकीत जुन्या नोटांवरील व्याजाचा फटका अशा प्रतिकूल परिस्थितीतही सांगली जिल्हा बॅँकेत उद्दिष्टपूर्तीचा जोश कायम राहिला आहे. मार्चचा शेवटचा आठवडाच हाती राहिल्याने बॅँकेत मोठ्या थकबाकींच्या वसुलीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेस मार्च २0१६ मध्ये ८३ कोटी ७२ लाखांचा ढोबळ नफा झाला होता. गत आर्थिक वर्षात बॅँकेने विक्रमी कामगिरी करीत आजवरचे नफ्याचे सर्व विक्रम मोडीत काढले होते. २0१५ पर्यंत बॅँकेच्या २१७ पैकी २१६ शाखा नफ्यात होत्या. मुख्य कार्यालय तोट्यात होते. २0१६ मध्ये मुख्य कार्यालयसुद्धा नफ्यात आले. या सर्व कामगिरीस जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील आणि त्यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांची मेहनत या गोष्टी कारणीभूत ठरल्या. नफ्याचा विक्रम कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर पडला. पगारवाढ, पदोन्नती अशा महत्त्वाच्या व प्रलंबित मागण्या मान्य झाल्या. त्याचवेळी बॅँकेच्या अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना २0१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता नफ्याचे शतक गाठण्याचे उद्दिष्ट दिले.
गतवर्षाच्या नफ्याचा विचार करता यंदाचे उद्दिष्ट फारसे अवघड नव्हते, मात्र रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणांमुळे बॅँकेसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. नोटाबंदीच्या काळात ठप्प असलेले जिल्ह्यातील बॅँकेचे व्यवहार आणि ३१५ कोटींच्या जुन्या शिल्लक रकमेवरील व्याजाचा फटका या दोन गोष्टी सर्वात जास्त चिंतेच्या होत्या. या गोष्टींचा फटका उद्दिष्टपूर्तीला बसण्याची चिन्हेही दिसत आहेत. तरीही सर्व अडचणींचे बांध ओलांडून उद्दिष्टपूर्तीचा झेंडा फडकविण्यासाठी बॅँकेचे कर्मचारी राबत आहेत. बॅँकेच्या अध्यक्षांनीही वारंवार आढावा घेत वसुलीवर लक्ष ठेवले आहे. मोठ्या थकबाकीदारांकडे अडकलेल्या रकमा प्राधान्याने वसूल करण्यावर भर दिला आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाकडून येणे असलेल्या रकमांबाबतही लक्ष केंद्रित केले आहे. केलेल्या नियोजनाप्रमाणे मोहीम यशस्वी झाली, तर उद्दिष्टपूर्ती अवघड नसल्याचे अध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)