शरद पवार, राजारामबापूंच्या जीवनपटावरील पुस्तके वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:29 IST2021-09-21T04:29:55+5:302021-09-21T04:29:55+5:30
शिराळा : सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या २२ सप्टेंबर वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद ...

शरद पवार, राजारामबापूंच्या जीवनपटावरील पुस्तके वाटप
शिराळा : सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या २२ सप्टेंबर वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा जीवनपट, समाजकारण व राजकारणातील अनुभव कथन असलेले लोक माझे सांगाती या पुस्तकांच्या १ हजार प्रती व लोकनेते स्व. राजारामबापू पाटील यांच्या जीवनावरील ‘बापू’ या पुस्तकाच्या ५०० प्रतींचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती वाढदिवस सत्कार समितीच्यावतीने पत्रकार बैठकीत देण्यात आली.
राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांना स्वातंत्र्य सैनिक स्व. आनंदराव नाईक, लोकनेते स्व. फत्तेसिंगराव नाईक, वडील आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडून समाजकारण, औद्योगिक, शेती, साहित्य व सांस्कृतिक प्रगतीचा वारसा मिळाला आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील व वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. पक्षाचे काम, ध्येय धोरणे, संघटन करून युवकांना प्रेरित करण्याचे काम ते जिल्ह्यात करत आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी आहे. त्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्त्यांना व्हावी, या उद्देशाने पुस्तकाचे वाटप करण्यात येणार आहे. २२ सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.
तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत सर्व आरोग्य सेविका, आशा व अंगणवाडी सेविकांना शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत कोविड काळात दिलेल्या योगदानाबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल. हा उपक्रमही २२ सप्टेंबर रोजी शिराळा तालुक्याच्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते करतील, असेही समितीच्यावतीने सांगण्यात आले.
चौकट
सत्कार स्वीकारणार नाही
विराज नाईक हे २२ सप्टेंबर या वाढदिवशी त्यांच्या चिखली (ता. शिराळा) येथील निवासस्थानी, जिल्ह्यात कोठेही सत्कार, हार, पुष्पगुच्छ स्वीकारण्यासाठी उपलब्ध असणार नाहीत. त्याची नोंद राष्ट्रवादी काँग्रेसवर व नाईक कुटुंबीयावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही समितीने केले.