जिल्हा परिषदेतील असंतुष्टांना पंढरीचा विठ्ठलही पावलाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST2021-08-18T04:32:40+5:302021-08-18T04:32:40+5:30

सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाविषयी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोअर कमिटीतील सदस्यांसोबत मंगळवारी चर्चा केली. पंढरपुरात ...

Disgruntled in Zilla Parishad did not even get Pandhari Vitthal! | जिल्हा परिषदेतील असंतुष्टांना पंढरीचा विठ्ठलही पावलाच नाही!

जिल्हा परिषदेतील असंतुष्टांना पंढरीचा विठ्ठलही पावलाच नाही!

सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाविषयी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कोअर कमिटीतील सदस्यांसोबत मंगळवारी चर्चा केली. पंढरपुरात आमदार प्रशांत परिचारक यांच्या फार्महाऊसवर तासभर चर्चेचे गुऱ्हाळ रंगले, निर्णय मात्र झालाच नाही.

पदाधिकारी बदलासाठी बऱ्याच दिवसांपासून हालचाली सुरू असून, सत्ताधारी गटातच दुफळी निर्माण झाली आहे. असंतुष्ट सदस्यांनी अविश्वास ठरावाचा पवित्राही घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपुरात फडणवीस यांनी कोअर कमिटीच्या सदस्यांना चर्चेसाठी बोलाविले होते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, विलासराव जगताप, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, राजेंद्रअण्णा देशमुख आदी नेत्यांसोबत फडणवीस यांनी चर्चा केली. बदलाविषयीची एकूण स्थिती नेत्यांनी फडणवीस यांना सांगितली. पहिल्या टप्प्यात सर्वांची एकत्र बैठक झाली, त्यानंतर फडणवीस यांनी वैयक्तिकरित्या काहींच्या भेटी घेतल्या. नेतेमंडळींनी जिल्हा परिषदेतील संख्याबळ, बदलासाठीची सदस्यांची मोहीम, संभाव्य धोके यांची माहिती दिली.

असंतुष्टांनी सुरू केलेल्या अविश्वास मोहिमेविषयीदेखील नेतेमंडळींनी नाराजी व्यक्त केली. फडणवीस यांनी भूमिका जाणून घेतली, मात्र बदलाविषयी निश्चित निर्णय दिला नाही. दोन दिवसांत ‘मेसेज’ येईल अशी शक्यता नेत्यांनी व्यक्त केली.

फडणवीसांसोबतच्या बैठकीत नेमका कोणता निर्णय होतो, याची माहिती घेण्यासाठी काही सदस्यांनीही पंढरपूर गाठले होते, फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्नही त्यांनी केला, पण भेट झाली नाही.

चौकट

ताकही फुंकून पिण्याची भूमिका

महापालिकेत पुरेसे संख्याबळ असतानाही भाजप सत्ता हरवून बसला, जिल्हा परिषदेत तर अन्य पक्षांच्या कुबड्या घेऊन सत्तेवर आहोत. या स्थितीत पदाधिकारी बदलाच्या प्रक्रियेत धोका होणार नाही कशावरुन, असा खडा सवाल माजी आमदार विलासराव जगताप यांनी उपस्थित केला. अन्य नेत्यांनीही हाच सूर आळवला. त्यामुळे पक्षाने ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले.

कोट

देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी सर्व सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पदाधिकारी बदलातील धोके जाणून घेतले. बैठकीत कोणताही ठोस निर्णय मात्र दिला नाही. दोन-तीन दिवसांत निरोप मिळण्याची शक्यता आहे.

- मकरंद देशपांडे, भाजप नेते.

Web Title: Disgruntled in Zilla Parishad did not even get Pandhari Vitthal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.