तासगाव : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी गुरुवारी सकाळी ८ वाजता माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीतून भाजपामध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत असणाऱ्या संजयकाकांसाठी चंद्रकांत पाटील यांचा दौरा घरवापसीच्या पार्श्वभूमीवरच असल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संजयकाकांच्या घरवापसीबाबत या भेटीत दोन्ही नेत्यांत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.माजी खासदार संजय पाटील भाजपाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर लोकसभेला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत संजयकाकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घेतले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीतदेखील संजयकाकांचा पराभव झाला. या पराभवानंतर संजयकाकांना पुन्हा भाजपामध्ये येण्याचे वेध लागले होते. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे घरवापसीची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, भाजपाकडून घरवापसीसाठी ग्रीन सिग्नल मिळाला नव्हता. यापूर्वीही पालकमंत्री पाटील यांना संजयकाकांनी काहीवेळा निमंत्रित केले होते. मात्र, पाटील यांनी चिंचणी दौरा टाळला होता. परंतु, गुरुवारी सकाळी पालकमंत्री पाटील यांनी संजयकाकांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे संजयकाकांच्या घरवासीचे संकेत मिळाल्याचे सांगितले जात आहे. अद्याप याबाबत शिक्कामोर्तब झाले नसले, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि जिल्ह्यात भाजपाला बळकट करण्याबाबत दोन्ही नेत्यांत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. मंत्री पाटील यांच्या सदिच्छा भेटीवेळी भाजपाचे तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रभाकर पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.
Sangli Politics: चंद्रकांत पाटील यांनी संजयकाकांची भेट घेतली, भाजप 'घरवापसी'ची चर्चा रंगली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 13:36 IST