निवडणूक प्रशिक्षणात नाराजी
By Admin | Updated: September 16, 2014 23:45 IST2014-09-16T22:43:50+5:302014-09-16T23:45:01+5:30
समन्वयाचा अभाव : लोकसभेच्या भत्त्याबाबत विचारणा

निवडणूक प्रशिक्षणात नाराजी
सांगली : तहसील कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कामात असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव, पदांबाबतची संभ्रमावस्था आणि भत्ता देण्यास होत असलेल्या विलंबाबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज मंगळवारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सूचना मांडण्यात याव्यात, अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. यावेळी सूचनांपेक्षा नाराजीच अधिक व्यक्त झाली. निवडणूक खर्च निरीक्षकांना वाहने देताना नसलेले नियोजन, दोन्ही कार्यालयांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव, पोलीस संरक्षणाची कमतरता तसेच प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना येत असलेल्या अडचणी याबाबत नाराजी व्यक्त झाली. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तात्काळ केले जावे, अशी अपेक्षाही काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणूक आली तरी अद्याप भत्ते देण्यात आले नाहीत. याबाबतही कर्मचाऱ्यांनी विचारणा केली. यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी भत्त्यापोटीची रक्कम प्राप्त झाली असून, ती कर्मचाऱ्यांना निश्चितपणे मिळेल, असे सांगितले. मिरज विधानसभा मतदारसंघासाठी सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून दोघांना स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत नियुक्तीपत्रे देण्यात आले होते. त्याबाबतही प्रशिक्षण कार्यक्रमानंतर अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. काही द्वितीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना गत लोकसभा निवडणुकीत प्रथम श्रेणीतील कामाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. प्रत्यक्षात भत्ता मिळताना त्यांना कोणत्या श्रेणीनुसार मिळणार, याची कल्पना कोणत्याही अधिकाऱ्याला नाही. त्याबाबची माहितीही कोणी दिलेली नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या विविध पथकांच्या प्रमुखांचे आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आज (मंगळवार) झाले. या प्रशिक्षण शिबिरास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी भोसले-जाखलेकर यांच्यासह सर्व संबंधित पथकांचे प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बर्डे म्हणाल्या की, जिल्ह्यतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी तीन भरारीपथके, तसेच प्रत्येकी तीन स्थिर सर्वेक्षण पथके, खर्च विषयक पथक, व्हीडीओ पथक अशी आवश्यक सर्व पथके कार्यान्वित करण्यात आली असून, प्रत्येक पथकप्रमुखांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार काम करावे. सर्व पथकांनी विधानसभा निवडणूक मुक्त, निर्भय आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी त्यांना दिलेल्या अधिकारांचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना करून उपजिल्हा निवडणूक अधिकारी मौसमी बर्डे म्हणाल्या, खर्चविषयक पथकातील सहाय्यक खर्च निरीक्षकांनी उमेदवारांच्या खर्चाबाबत आयोगाच्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)
‘वॉच’साठी ४८ पथके कार्यान्वित
जिल्ह्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके, व्हीडीओ पथक, लेखापथक अशी ४८ पथके कार्यान्वित केली असून, या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपआपली कर्तव्ये चोखपणे पार पाडावीत, अशी सूचना उपजिल्हा निवडणूक अधिकारी मौसमी बर्डे यांनी आज (मंगळवार) येथे केली. पथकांतील कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.