डायलिसिस मोफत होणार; सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळमध्ये कार्यान्वित, अन्य ठिकाणी लवकरच
By अविनाश कोळी | Updated: January 2, 2025 18:58 IST2025-01-02T18:57:45+5:302025-01-02T18:58:15+5:30
अविनाश कोळी सांगली : डायलिसिसची गरज असलेल्या सामान्य रुग्णांना आता आरोग्य यंत्रणेने मोठा दिलासा दिला आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा ...

डायलिसिस मोफत होणार; सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळमध्ये कार्यान्वित, अन्य ठिकाणी लवकरच
अविनाश कोळी
सांगली : डायलिसिसची गरज असलेल्या सामान्य रुग्णांना आता आरोग्य यंत्रणेने मोठा दिलासा दिला आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा व राष्ट्रीय आरोग्य अभियानातून उपजिल्हा रुग्णालयांमध्ये डायलिसिस सेंटर्स उभारले जात आहेत. कवठेमहांकाळ येथील केंद्र कार्यान्वित झाले असून इस्लामपूर, आष्टा, कोकरुड, विटा याठिकाणीही हे सेंटर्स सुरू होणार आहेत. त्यामुळे याठिकाणी रुग्णांना मोफत डायलिसिसची सुविधा उपलब्ध होईल.
जिल्ह्याच्या प्रत्येक भागात ही सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आरोग्य यंत्रणेची धडपड सुरू आहे. कवठेमहांकाळ येथे कोरोना काळात उभारलेलेे ५० बेडचे रुग्णालय आता डायलिसिस सेंटर म्हणून रूपांतरित झाले आहे. याठिकाणी आठ डायलिसिस यंत्रे बसविण्यात आली आहेत. दोन शिफ्टमध्ये येथे १६ रुग्णांचे डायलिसिस केले जाऊ शकते. आता इस्लामपूरमध्ये लवकरच सेंटर सुरू होणार आहे. आष्टा, कोकरुड, विटा येथेही सेंटर्स उभारणीच्या हालचाली सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वत्र जागेच्या उपलब्धतेनुसार डायलिसिस सेंटर उभारण्याचे नियोजन केले जात आहे.
५५ रुग्णांना लाभ
कवठेमहांकाळ येथील केंद्रात आजवर ५५ रुग्णांचे डायलिसिस करण्यात आले. जत, मिरज पूर्व, तासगाव, सांगोला, अथणी या भागातील रुग्णांना या केंद्राचा लाभ होणार आहे, अशी माहिती येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय भाेसेकर यांनी दिली.
नियुक्त संस्थेमार्फत काम
यलिसिस सेंटरचे काम एचएलएल लाइफ केअर लिमिटेडमार्फत चालविले जाते. डॉक्टर, तंत्रज्ञ व कर्मचारी त्यांच्यामार्फतच नियुक्त केले जातात. रुग्णांना मोफत सेवा दिल्यानंतर शासनाकडून त्यांना त्याची प्रतिपूर्ती मिळते.
विट्यामध्ये शंभर बेडच्या रुग्णालयाचा प्रस्ताव
विट्यात शंभर बेडच्या रुग्णालयाचा प्रस्ताव असून त्याठिकाणी डायलिसिस सेंटर उभारले जाणार आहे. जागेची निश्चिती झाल्यास त्याठिकाणीही सेवा सुरू होईल. त्याचा लाभ परिसरातील रुग्णांना होणार आहे.
मशीन काम कसे करते ?
किडनी निकामी ठरल्यानंतर रुग्णाला वाचविण्यासाठी डायलिसिस हा पर्याय उत्तम ठरतो. मशीनद्वारे रुग्णांच्या रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून शुद्ध रक्त शरीरात पुरविले जाते. ही मशीन किडनीसारखेच कृत्रिमरीत्या काम करते. किडनीग्रस्त रुग्ण हा डायलिसिस उपचार घेऊन १५ वर्षांपासून जास्त काळ जगू शकतो.
कवठेमहांकाळ येथील डायलिसिस सेंटर अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे. जिल्ह्याच्या अन्य भागातील प्रस्तावित सेंटर्सही लवकरच सुरू होतील. या सेंटरच्या माध्यमातून सामान्य रुग्णांना मोफत सेवा मिळणार आहे. त्यामुळे शासनाची ही योजना लोकांना दिलासा देणारी आहे. - डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा शल्यचिकित्सक, सांगली