विद्यापीठातील ज्योतिषशास्त्राचा अभ्यास मागे घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST2021-06-27T04:18:22+5:302021-06-27T04:18:22+5:30

सांगली : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) या वर्षीपासून सुरू केलेला ज्योतिष अभ्यासक्रम रद्द करण्याची मागणी अंधश्रद्धा ...

Demand to withdraw the study of astrology in the university | विद्यापीठातील ज्योतिषशास्त्राचा अभ्यास मागे घेण्याची मागणी

विद्यापीठातील ज्योतिषशास्त्राचा अभ्यास मागे घेण्याची मागणी

सांगली : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (इग्नू) या वर्षीपासून सुरू केलेला ज्योतिष अभ्यासक्रम रद्द करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. अशास्त्रीय गोष्टींच्या प्रशिक्षणाचा दावा करणारा हा अभ्यासक्रम समाजासाठी घातक असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

‘अंनिस’ने सांगितले की, ज्योतिषाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ते एक छद्मविज्ञान आहे. खगोलशास्त्राच्या अभ्यासानुसार ग्रह, गोल, ताऱ्यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे ज्योतिष अभ्यासक्रम तातडीने रद्द करावा. २००१ मध्ये वाजपेयी सरकारनेही या अभ्यासक्रमाचा निर्णय घेतला होता. प्रचंड विरोधामुळे तो मागे घेतला होता. डॉ. जयंत नारळीकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ खगोल वैज्ञानिकांनी याला विरोध केला होता. जेष्ठ वैज्ञानिक जेम्स रॅन्डी यांनी ज्योतिषांच्या जगाच्या अंताविषयीच्या ५० दाव्यांचा फोलपण सिद्ध केला होता. नोबेल विजेते व्ही. वेंकटरामन यांनीही ज्योतिषाची तुलना छद्मविज्ञानाशी केली आहे.

‘अंनिस’ने सांगितले की, इग्नूच्या अभ्यासक्रमातून चंद्रग्रहण, सूर्यग्रहण अशा खगोलीय घटनांविषयी अज्ञान आणि भीती पसरविली जात आहे. ज्योतिषविषयक गैरसमज दूर करणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असताना मुक्त विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरू करणे हे आक्षेपार्ह आहे.

कोरोनामध्ये विज्ञानवादी मानसिकतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, अशा वेळी अशास्त्रीय गोष्टीना उत्तेजन देण्याचे शासनाने टाळायला हवे.

‘अंनिस’चे प्रा. प. रा. आर्डे, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव, केदारनाथ सुरवसे, चंद्रकांत उळेकर, कमलाकर जमदाडे, भगवान रणदिवे, राहुल थोरात, फारुख गवंडी, वाघेश साळुंखे, स. नि. पाटील, डॉ. संजय निटवे, इब्राहिम नदाफ यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.

चौकट

वैज्ञानिकांचे निवेदन देणार

‘अंनिस’तर्फे देशभरातील प्रमुख २५ वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ज्ञांच्या सह्यांचे निवेदन मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर ह्यांना देण्यात येणार आहे. ‘इग्नू’मधील ज्योतिष अभ्यासक्रम रद्द करण्याची मागणी त्याद्वारे केली जाणार आहे, असे ‘अंनिस’ने सांगितले.

Web Title: Demand to withdraw the study of astrology in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.