पाच जिल्ह्यांत पेट्रोल व डिझेलची मागणी केवळ निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:19 IST2021-06-28T04:19:22+5:302021-06-28T04:19:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतरही मर्यादित प्रवासी वाहतूक व मालवाहतूक, इंधन दरवाढ या कारणांमुळे ...

पाच जिल्ह्यांत पेट्रोल व डिझेलची मागणी केवळ निम्म्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतरही मर्यादित प्रवासी वाहतूक व मालवाहतूक, इंधन दरवाढ या कारणांमुळे मिरजेतील इंधन डेपाेतून पाच जिल्ह्यात होणारे पेट्रोल व डिझेलचे वितरण ५० टक्क्यांवर आले आहे. सलग दोन वर्षे सुटीचा हंगाम वाया गेला असून, इंधनाला मागणी नसल्याने इंधन कंपन्यांसह पेट्रोलपंप चालकांना आर्थिक फटका बसला आहे.
मिरजेतील भारत पेट्रोलियम व इंडियन ऑईलच्या इंधन डेपोतून सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील पेट्रोलपंपाना इंधनाचे वितरण होते. पाच जिल्ह्यांत भारत पेट्रोलियमचे २३० व इंडियन ऑईलचे २४० पेट्रोलपंप आहेत. या पेट्रोल पंपांना भारत पेट्रोलियम व इंडियन ऑईलकडून दररोज सुमारे २५ लाख लीटर इंधनाचा पुरवठा करण्यात येतो. भारत पेट्रोलियम व इंडियन ऑईल या दोन्ही इंधन डेपोत सुमारे ५५ लाख लीटर पेट्रोल व १८० लाख लीटर डिझेल इंधनसाठ्याची क्षमता आहे. कोरोना प्रतिबंधासाठी सलग दोन वर्षे मार्च एप्रिलपासून लाॅकडाऊन काळात इंधन विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली. अत्यावश्यक सेवांसाठीच मर्यादित इंधन वितरणाची परवानगी असल्याने इंधन विक्री ३० टक्क्यांवर होती. लाॅकडाऊन काळात मागणी नसल्याने इंधन डेपोतून एक दिवसआड वितरण सुरु होते. लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर प्रशासनाने इंधन विक्रीवरील निर्बंध उठवले. एस. टी., रिक्षा सुरु झाल्याने इंधनाच्या खपात वाढ होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, रेल्वे व एस. टी.च्या मर्यादित फेऱ्या, सर्व व्यवसायांवर निर्बंध असल्याने इंधनाचा खप अनलाॅक काळातही ५० टक्क्यांवरच आहे. इंडियन ऑईल डेपोत पुणे येथून व भारत पेट्रोलियम डेपोत मनमाड येथून रेल्वे टॅकरने इंधन पुरवठा होतो. मात्र, आता मागणी नसल्याने आठवड्यातून एकदा रेल्वे टॅकर मिरजेत येत आहेत. मार्च ते जून या सुटीच्या हंगामात पेट्रोल व डिझेलचा वापर व मागणी वाढते. मात्र, सलग दोन वर्षे सुटीच्या हंगामातच मोठे नुकसान सोसावे लागले आहे. डिझेलच्या तुलनेत पेट्रोलचा खप तर केवळ ४० टक्के आहे. प्रवासी व मालवाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु होईपर्यंत इंधनाचा वापर कमी असल्याने इंधन कंपन्या व पेट्रोलपंपचालक नुकसानात आहेत. दोन महिन्यानंतर लाॅकडाऊन शिथील होत असताना पुन्हा कोरोना प्रतिबंधासाठी निर्बंध लागू केल्याने इंधनाच्या खपावर त्याचा परिणाम होणार आहे.
चाैकट
दरवाढीचाही परिणाम
गेल्या चार महिन्यात इंधन दरात तब्बल २० ते ३० रुपये दरवाढ झाल्यानेही खपावर परिणाम झाला आहे. दररोज दर वाढत असल्याने पंपचालकांकडून इंधन खरेदी कमी होत आहे. भारत पेट्रोलियमचे खासगीकरण होण्याची शक्यता असल्याने पेट्रोलपंप चालकांना उधारीवर इंधन विक्री बंद आहे. या सर्वाचा परिणाम पुरवठ्यावर झाला आहे. मिरजेतील इंधन डेपोबाहेर नेहमी असणारी टॅकरच्या रांगा आता कमी झाल्याचे चित्र आहे.