मागणी २ लाखांची, मिळताहेत १५-२० हजार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:26 IST2021-05-08T04:26:50+5:302021-05-08T04:26:50+5:30
फोटो संतोष भिसे- लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लसीसाठी सकाळी सातपासूनच रांगा, अवघ्या पन्नासभर लसींचा पुरवठा आणि त्यासाठी जीवघेणी ...

मागणी २ लाखांची, मिळताहेत १५-२० हजार डोस
फोटो
संतोष भिसे- लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लसीसाठी सकाळी सातपासूनच रांगा, अवघ्या पन्नासभर लसींचा पुरवठा आणि त्यासाठी जीवघेणी चढाओढ असे सार्वत्रिक चित्र विविध लसीकरण केंद्रांवर आहे. लसीसाठी जिल्हाभरात हाणामाऱ्या सुरू आहेत. मागणी २ लाखांची असताना पुरवठा मात्र १०-१५ हजार डोसचा होत आहे, त्यामुळे लसीकरण अडथळ्यांची शर्यत बनले आहे.
जानेवारीत लसीकरण सुरू झाल्यापासून अवघे १९ टक्के लसीकरण झाले आहे. या गतीने शंभर टक्के लसीकरणासाठी २०२२ उजाडण्याची भिती आहे. मंगळवारी (दि. ४) रात्री १८ हजार ४०० डोस मिळाले. त्यातून प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रांना अवघे २०० डोस देण्यात आले. कार्यक्षेत्रातील गावांच्या वाट्याला ५० डोसही आले नाहीत.
गुरुवारी (दि. ६) रात्री १० हजार डोस मिळाले, ते पुरणार नसल्याने फक्त दुसऱ्या डोससाठी वापरण्यात आले. शुक्रवारी पहिल्या डोसअंतर्गत लसीकरण झालेच नाही. १८ ते ४५ वर्षे वयोगटाचे लसीकरण १ मेपासून सुरू झाले, पण त्यासाठीही पुरेशी लस उपलब्ध नाही. लाभार्थ्यांची संख्या साडेसतरा लाख आहे, डोस मात्र फक्त साडेसात हजार मिळालेत. पुरेशा लसीअभावी फक्त पाच केंद्रे सुरू करता आली. सांगली, मिरज, विटा, इस्लामपूर व कवलापूर येथे तरुणांचे लसीकरण सुरू आहे.
चौकट
मागणी २ लाखांची, मिळताहेत २० हजार
लसीकरण अखंड सुरू राहण्यासाठी २ लाख डोसची मागणी आरोग्य यंत्रणेने केली आहे, पुरवठा मात्र १५ ते २० हजार डोसचा होत आहे. तोदेखील दोन-तीन दिवसांतून एकदा होतो. आठवडाभरात फक्त २८ हजार ४०० डोस मिळाले आहेत. असाच पुरवठा होत राहिला तर शंभर टक्के लसीकरणासाठी २०२२ वर्ष उजाडण्याची भीती आहे.
चाैकट
लसीकरणापेक्षा रुग्णसंख्याच जास्त
गेल्या आठवडाभरातील लसीकरणाची आकडेवारी पाहिली असता दररोज जितके नवे कोरोना रुग्ण, त्यापेक्षाही कमी लसीकरण होत असल्याचे दिसून आले. सोमवारी १,२३६ जणांना लस देण्यात आली, त्या दिवशी नवे १,५६८ रुग्ण सापडले. मंगळवारी १,१३५ जणांचे लसीकरण झाले, त्या दिवशी नव्याने निष्पन्न झालेल्या रुग्णांची संख्या १,५७५ होती.
चौकट
शुक्रवारचे चित्र असे होते
महाापालिकेला शुक्रवारी फक्त १,९०० डोस मिळाले. १९ लसीकरण केंद्रांना प्रत्येकी १०० दिले. त्यातून फक्त ४५ वर्षांवरील दुसऱ्या डोसच्या लाभार्थ्यांनाच लस देण्यात आली. इतरांना परत पाठविण्यात आले. दहा खासगी रुग्णालयांचा लस पुरवठा बंद झाला असून त्यांनी थेट कंपन्यांकडून विकत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चौकट
असे आहेत लाभार्थी
साठ वर्षांवरील
६० वर्षांवरील - ३ लाख २० हजार
४५ ते ५९ वर्षे - ६ लाख ३० हजार
१८ ते ४४ वर्षे - १७ लाख ५० हजार
चौकट
आकडे सांगतात...
जिल्ह्याची लोकसंख्या - सुमारे ३२ लाख
लसीकरण पात्र नागरिक - सुमारे २७ लाख
गुरुवारअखेरचे लसीकरण - ५ लाख ८६ हजार १०६
पहिला डोस - ५ लाख १४ हजार ४५५
दुसरा डोस - ७१ हजार ६५
पहिल्या डोसची टक्केवारी - १९ टक्के
दुसऱ्या डोसची टक्केवारी - २.६३ टक्के