मद्यनिर्मितीच्या स्पिरिटला जीएसटीमधून सवलतीचा निर्णय; राज्यभरातील साखर कारखाने, आसवनी प्रकल्पांना दिलासा
By संतोष भिसे | Updated: June 28, 2024 17:08 IST2024-06-28T17:07:54+5:302024-06-28T17:08:46+5:30
सांगली : साखर कारखान्यांमध्ये मद्य निर्मितीसाठी वापरले जाणारे एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल तथा रेक्टिफाइड स्पिरिटवरील जीएसटी रद्द करण्याचा निर्णय अर्थ ...

मद्यनिर्मितीच्या स्पिरिटला जीएसटीमधून सवलतीचा निर्णय; राज्यभरातील साखर कारखाने, आसवनी प्रकल्पांना दिलासा
सांगली : साखर कारखान्यांमध्ये मद्य निर्मितीसाठी वापरले जाणारे एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल तथा रेक्टिफाइड स्पिरिटवरील जीएसटी रद्द करण्याचा निर्णय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे साखर आणि आसवनी उद्योगाला फार मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या शनिवारी जीएसटी परिषदेची ५३ वी बैठक झाली. त्यात विविध उत्पादनांवरील जीएसटी आकारणीचा आढावा घेण्यात आला. त्यात साखर कारखान्यांना दिलासा देणारा हा निर्णय घेण्यात आला आहे. एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल तथा स्पिरिटवर यापूर्वी वस्तू आणि सेवा कर आकारणी केली जायची. जीएसटी परिषदेच्या बैठकीतील निर्णयानुसार मानवी वापरासाठीच्या अल्कोहोलयुक्त मद्य उत्पादनासाठी त्यात सवलतीचा निर्णय झाला. या मद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्पिरीटला जीएसटीच्या कक्षेतून वगळण्याला मंजुरी मिळाली. त्यामुळे आसवनी उद्योगावरील कराचा भार हलका झाला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रभरातील साखर कारखाने व आसवनी प्रकल्पांना जीएसटी विभागाने करवसुलीसाठी यापूर्वी शेकडो कोटींच्या कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. मद्यनिर्मितीसाठीचे स्पिरिट व एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलवर जीएसटी भरण्याचे आदेश दिले होते. या रकमा काही कोटींच्या घरात आहेत. जीएसटी परिषदेने आता हा कर माफ केल्याने कारखान्यांना बजावलेल्या नोटिसा मागे घ्याव्या लागण्याची शक्यता आहे. करमाफीचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने अंमलात आल्यास कारखान्यांचा फायदा होणार आहे.