काळ्या खणीत मृत माशांचा खच : प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 19:25 IST2019-12-05T19:24:14+5:302019-12-05T19:25:53+5:30

काळ्या खणीत मासे मृत झाल्याचे गुरुवारी सकाळी आढळून आले. सकाळपासूनच वडर कॉलनी, सुंदरनगर परिसरात दुर्गंधी पसरली होती. मासे नेमके कशामुळे मृत झाले, याची चर्चा सुरू होती. काळ्या खणीत मोठ्या प्रमाणात दूषित पाणी आहे.

Dead fish costs in black mining | काळ्या खणीत मृत माशांचा खच : प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर

शहरातील काळ्या खणीतील हजारो मासे गुरुवारी मृत झाले. यावेळी आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी खणीत पावडर फवारणी केली.

ठळक मुद्देआरोग्य विभागाकडून पावडर फवारणी

सांगली : येथील काळ्या खणीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, गुरुवारी खणीतील हजारो मासे मृत झाल्याचे आढळून आले. मृत माशांमुळे वडर कॉलनी परिसरात दुर्गंधी पसरली होती. नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. त्यानंतर काळ्या खणीत ब्लिचिंग पावडर मारण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले.

 

काळ्या खणीत मासे मृत झाल्याचे गुरुवारी सकाळी आढळून आले. सकाळपासूनच वडर कॉलनी, सुंदरनगर परिसरात दुर्गंधी पसरली होती. मासे नेमके कशामुळे मृत झाले, याची चर्चा सुरू होती. काळ्या खणीत मोठ्या प्रमाणात दूषित पाणी आहे. त्यात काहीजण मासेमारीही करतात. अज्ञाताकडून पाण्यात रसायन अथवा गूळ टाकला असावा, त्यामुळे मासे मृत झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मार्केट यार्डातील गुळाची पोती धुतल्याने ते पाणी गटारीद्वारे काळ्या खणीत मिसळल्याने मासे मृत झाल्याचा दावा काहींनी केला. सध्या काळ्या खणीत मत्स्यपालनासाठी खासगी ठेकेदार नियुक्त केला आहे. त्याने चार दिवसांपासून चार लाख रुपयांचे लहान मासे खणीत सोडले होते. हे मासेही मृत झाल्याने या ठेकेदाराचेही लाखोंचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, या परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर नागरिकांनी नगरसेविका वर्षा निंबाळकर यांच्याशी संपर्क साधून तक्रार केली. निंबाळकर यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना काळ्या खणीच्या स्वच्छतेची सूचना केली. त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी ब्लिचिंग पावडर टाकण्याचे काम हाती घेतले आहे. यापूर्वीही अनेकदा काळ्या खणीत मासे मृत झाल्याचा प्रकार घडला आहे.

काळ्या खणीच्या सुशोभिकरणाची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. तसा प्रस्तावही केंद्र शासनाकडे पाठविला आहे. पण त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. पर्यावरण विभागाकडे हा प्रस्ताव आहे. सत्ताधारी भाजपनेही काळ्या खणीच्या सुशोभिकरणाची ग्वाही दिली आहे. तातडीने सुशोभिकरणाचे काम सुरू झाल्यास काळ्या खणीचे प्रदूषण थांबेल आणि नागरिकांसाठी एक पर्यटनस्थळ निर्माण होईल, असे निंबाळकर म्हणाल्या.

 

 

Web Title: Dead fish costs in black mining