Sangli News: शेत, दागिने विकले...कर्ज काढले अन् सुनेने सासुला जीवदान दिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 11:37 IST2025-10-29T11:37:24+5:302025-10-29T11:37:59+5:30
सासू–सुनेच्या नात्याची एक अनोखी कहाणी

Sangli News: शेत, दागिने विकले...कर्ज काढले अन् सुनेने सासुला जीवदान दिले
दिलीप मोहिते
कुरळप : कुरळप (ता. वाळवा) गावातून सासू–सुनेच्या नात्याची एक अनोखी कहाणी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. यकृत निकामी झाल्याने सासुच्या जिवाला धोका निर्माण झाल्यावर पोलिस असलेल्या सुनेने तिच्यावर उपचारासाठी जिवाचे रान केले. दागिने, शेतजमीन विकून कर्ज काढून उपचाराचा खर्च भागवत सासुला जीवदान दिले.
सहायक पोलिस उपनिरीक्षक मायादेवी सुधीर कामेरीकर यांनी सासू आकाशी बापूसाहेब कामेरीकर यांच्यासाठी दाखवलेले प्रेम, निष्ठा, त्याग समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
काही महिन्यांपूर्वी आकाशीबाईंचे यकृत पूर्णपणे निकामी झाल्याचे कुटुंबाला समजले. डॉक्टरांच्या ‘गॅरंटी नाही’ या शब्दांनी सगळ्यांचे मन जड झाले, पण मायादेवींनी हार मानली नाही.
सासूला वाचवण्यासाठी त्यांनी आर्थिक, मानसिक आणि शारीरिक सर्व ताण सहन केले. उपचारासाठी निधी कमी पडल्यावर त्यांनी ३८ तोळे सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढले, शेतीजमीन विकली आणि स्वतःच्या पगारावर तब्बल ६० लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले.
डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपण सुचवले तरी वैद्यकीय अडचणींमुळे त्यांच्या यकृताचा पर्याय शक्य झाला नाही. तरीही मायादेवींनी संयम राखला. अखेर सासुवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी मोकळा श्वास घेतला.
दीडशे किलोमीटरचा प्रवास पायी
भक्तिभावाने गणपतीपुळ्याच्या श्रीमंत गणपतीला सुनेने साकडे घातले “सासू बरी झाल्यास मी पायी येईन.” काही काळातच आकाशीबाईंची प्रकृती सुधारली. मायादेवींनी पोलिस ड्युटी सांभाळत १५० किलोमीटरचा प्रवास पायी पूर्ण केला. उन्हाचा त्रास, पायांचे फोड, दमछाक या सर्व अडचणींनीही त्या थांबल्या नाहीत.