Damage of eight lakhs, compensation of eighteen thousand | नुकसान आठ लाखांचे, भरपाई अठरा हजारांची
नुकसान आठ लाखांचे, भरपाई अठरा हजारांची

दत्ता पाटील ।
तासगाव : परतीच्या पावसाने द्राक्षबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. पंचनाम्यांनंतर राज्यपालांकडून तुटपुंजी रक्कम जाहीर करण्यात आली. त्यामुळे नुकसान अन् कर्जाच्या खाईत गेलेल्या द्राक्ष बागायतदारांचा भ्रमनिरास झाला आहे. नुकसान आठ लाखांचे अन् भरपाई अठरा हजारांची, असेच चित्र असून भरपाईची रक्कम ही शेतकºयांच्या एक दिवसाच्या औषध खर्चापेक्षाही कमी आहे. त्यामुळे नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करून सरसकट पीककर्ज माफ करावे, अशी मागणी होत आहे.

नेहमीच दुष्काळाच्या सावटात असणाºया द्राक्षबागांना यंदा अतिवृष्टीचा सामना करावा लागला. परतीच्या पावसाने सलग आठ दिवस झोडपून काढल्याने, तालुक्यातील पीक छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांना मोठा फटका बसला. ऐन हंगामात पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केल्याने शेतकºयांनी मोठ्या जिद्दीने द्राक्षबागा वाचवण्यासाठी धडपड सुरु केली. द्राक्षबागा वाचतील या आशेने आठ दिवसांत केवळ औषध फवारणीसाठी लाखभर रुपये खर्च केले. मात्र इतके करूनही द्राक्षबागा वाचल्या नाहीत.

द्राक्ष उत्पादनासाठी वर्षभर कष्ट करून, खते, औषधे, मजुरीसाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. वर्षभर राबल्यानंतर एकरी तीन ते आठ लाखापर्यंत उत्पन्न मिळते. मात्र   यावर्षी पावसाने झोडपून काढल्याने तालुक्यातील बहुतांश द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. प्रशासनाच्या पंचनाम्यानुसार तालुक्यातील ८ हजार ६०० हेक्टर द्राक्षबागांचे नुकसान   झाले आहे. हेक्टरी आठ ते दहा लाखांचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसला आहे. उत्पन्नापासून वंचित राहावे लागलेच, मात्र घातलेल्या खर्चाचा भुर्दंडही सोसावा लागला आहे.

शासनाकडून भरीव मदत मिळेल, या आशेवर द्राक्ष बागायतदार होते. मात्र खर्च आणि नुकसानीच्या तुलनेत केवळ मदतीची पाने तोंडाला पुसण्यात आल्याने द्राक्ष उत्पादक कर्जाच्या खाईत लोटले आहेत.द्राक्ष बागायतदारांना मदतीचा हात देण्यासाठी सरसकट पीककर्ज माफ करून भरीव मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Damage of eight lakhs, compensation of eighteen thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.