तस्लीमच्या काटेरी आयुष्याला फुलांचा बहर खडतर प्रवासाची कहाणी : दारुडा बाप, आईची आत्महत्या, नातेवाइकांनी झिडकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 23:12 IST2018-05-12T22:26:01+5:302018-05-12T23:12:31+5:30
सांगली : घरची संकटे असह्य झालेल्या आईने स्वत:ला जाळून घेतले... दारुड्या बापाला लकवा मारल्याने बेरोजगारीचे संकट घरावर कोसळले. सुस्थितीत असलेल्या त्यांच्या मुलास नातेवाइकांनी स्वीकारले, पण मतिमंद

तस्लीमच्या काटेरी आयुष्याला फुलांचा बहर खडतर प्रवासाची कहाणी : दारुडा बाप, आईची आत्महत्या, नातेवाइकांनी झिडकारले
अविनाश कोळी ।
सांगली : घरची संकटे असह्य झालेल्या आईने स्वत:ला जाळून घेतले... दारुड्या बापाला लकवा मारल्याने बेरोजगारीचे संकट घरावर कोसळले. सुस्थितीत असलेल्या त्यांच्या मुलास नातेवाइकांनी स्वीकारले, पण मतिमंद तस्लीमला मात्र झिडकारले. काटेरी प्रवासाची हृदय हेलावून टाकणारी तिची कहाणी पुढे आल्यानंतर माणुसकी जोपासलेल्या मनांनी तिला फुंकर घालत तिच्या आयुष्यात फुलांचा बहर निर्माण केला.
तस्लीम जावेदखान पठाण (वय ११) असे या मुलीचे नाव. सांगलीच्या खोजा कॉलनीत एका छोट्याशा घरात तिचा काटेरी प्रवास सुरू झाला. जन्मताच मतिमंद. वडील दारूच्या आहारी गेलेला. अनेकांनी समजाविले, पण सारेच अपयशी. शेवटी असह्य आईने तस्लीमच्या डोळ््यादेखत स्वत:ला पेटवून घेतले. तिला आणखी मानसिक धक्का बसला. आजही ती आईचा विषय काढला की भीतीने थरथर कापते.
आईच्या पश्चात दारुडा बाप बेरोजगार होऊन घरी बसून राहिला आणि त्याला नंतर अर्धांगवायूचा झटकाही आला. तस्लीम व तिचा दोन वर्षांनी मोठा असलेला भाऊ अशा या दोन मुलांची जगण्याची तडफड पाहून कॉलनीतील लोकांनी त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. नातेवाइकांनी मुलाला स्वीकारले; पण मतिमंदपणाचे कारण देऊन तस्लीमला झिडकारले. दिवस-रात्र ती कुठेही भटकू लागली.
उकिरड्यावरील खरकटे खाऊन ती जगू लागली. कॉलनीतील लोकांना तिची दया वाटत होती म्हणून प्रत्येकजण तिचे पालन-पोषण करू लागले. याच भागातील अकिलभाई भोजानी यांनी तिच्या पुनर्वसनाचे सर्व प्रयत्न केले, पण त्यांना अपयश आले आणि त्यांनीच तिचा सांभाळ सुरू केला. अखेर ही गोष्ट अकिलभार्इंनी इन्साफ फाऊंडेशनचे मुस्तफा ईलाही मुजावर यांच्या कानावर घातली. तिची कहाणी ऐकून मुस्तफा यांनी तिच्या पुनर्वसनाची जिद्द बाळगली. राज्यातील अनेक संस्थांना भेटी देऊन त्यांनी पुनर्वसनाचा प्रयत्न केला. मुस्तफा यांनी तिला स्वत:च्या घरी आणले. काही दिवसांनंतर महिला व बालकल्याण विभागाच्या प्रयत्नाने तासगाव येथील साधना विशेष मुलांच्या शाळेत तिच्या शिक्षणाला सुरुवात झाली. तरीही तिच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सर्वांनाच सतावत होता.
अखेर प्रदीर्घ प्रयत्नानंतर धुळे येथील श्री संस्कार मतिमंद मुलींच्या बालगृहात तिचे पुनर्वसन झाले. मुस्तफा यांच्यासह शासकीय अधिकारी, समाजसेवक, खोजा कॉलनीतील नागरिकांच्या प्रयत्नाने तिच्या काटेरी आयुष्यात फुलांचा बहर पसरला.