सायबर सेफ वुमेन मोहिम अत्यंत महत्वपूर्ण : महापौर संगीता खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 05:03 PM2020-01-03T17:03:51+5:302020-01-03T17:07:21+5:30

सामाजिक माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यांच्या वापराबाबत जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने राबविण्यात येत असलेली सायबर सेफ वुमेन मोहिम अत्यंत महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर संगीता खोत यांनी केले.

Cyber-Safe Women's Campaign Vital: Mayor Sangeeta Khot | सायबर सेफ वुमेन मोहिम अत्यंत महत्वपूर्ण : महापौर संगीता खोत

सायबर सेफ वुमेन मोहिम अत्यंत महत्वपूर्ण : महापौर संगीता खोत

googlenewsNext
ठळक मुद्देसायबर सेफ वुमेन मोहिम अत्यंत महत्वपूर्ण : महापौर संगीता खोतमहिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दल सदैव सज्ज : पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा

सांगली : सामाजिक माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्यांच्या वापराबाबत जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने राबविण्यात येत असलेली सायबर सेफ वुमेन मोहिम अत्यंत महत्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर संगीता खोत यांनी केले.

महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी सुरक्षा विषयक कायद्यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष पोलिस महानिरिक्षक महाराष्ट्र राज्य सायबर मुंबई यांच्या आदेशाने पोलिस अधिक्षक कार्यालय सांगली सायबर पोलिस ठाणे व जिल्हा माहिती कार्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सेफ वुमेन मोहिमेतंर्गत कृष्णा मॅरेज हॉल विश्रामबाग येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर संगीता खोत बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा होते. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक मनिषा डुबुले, सायबरतज्ज्ञ विनायक राज्याध्यक्ष, बार असोशिएशनच्या महिला सचिव ॲड. मुक्ता दुबे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, सायबर शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन कांबळे, पोलीस हेडकाँस्टेबल सिध्दार्थ कांबळे, मराठा सेवा संघ उद्योजक कक्ष अध्यक्षा तेजस्विनी सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

सामाजिक माध्यमांचा वापर करताना महिलांनी सजक राहा, कोणत्याही अमिषाला भूलथापांना बळी पडू नका. कठीण प्रसंग ओढवल्यास पोलिस यंत्रणाची मदत घ्यावी, असे आवाहनही महापौर संगीता खोत यांनी केले.

डरना मत , कहना मेरा भाई एस पी है - पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा

सायबर स्टॉकिंगला महिला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. सामाजिक माध्यमांच्या वापराबाबत महिलांना त्यांचे अधिकार माहिती असणे आवश्यक आहे. तुमची शांतता, सुरक्षितता, मानसिक स्वास्थ हिरावून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तुमच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दल सदैव सज्ज असून कोणत्याही दबावाला बळी पडू नका. कोणी तुम्हाला त्रास देत असल्यास निर्भय होऊन पोलिस यंत्रणेची मदत घ्या. कोणालाही घाबरू नका, असे सांगून पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी डरना मत कहना मेरा भाई एस पी है अशा शब्दात महिलांना आश्वस्त केले.

यावेळी त्यांनी महिलांसाठी 1091 हा हेल्पलाईन क्रमांक सुरू आहे. तसेच सर्व पोलिस ठाण्यामध्ये सखी हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे. निर्भया पथके सक्षमपणे कार्यरत आहेत. सायबर गुन्ह्यांबाबत सायबर सेल मदतीसाठी तत्पर आहे. महिलांनी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक तेंव्हा यांची मदत घ्यावी, असे आवाहन केले.

यावेळी सामाजिक माध्यमांचा वापर सजकतेने व दक्षतेने करण्याचे आवाहन करून आपले पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. पासवर्ड निवडताना वैशिष्टपूर्ण अक्षरांचा वापर करा. फेसबुकच्या खात्यामध्ये पब्लिक अक्सेस देऊ नका. अनोळखी प्रोफाईलवर संभाषण करू नका असे सांगून व्हॉटस्ॲप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यास त्यांची जबाबदारी ग्रुप ॲडमिनवर निश्चित करण्यात येईल याची जाणीव ही पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी केली.

अप्पर पोलिस अधिक्षक मनिषा डुबुले म्हणाल्या, सध्याचे युग हे संगणकाचे आहे. जग जवळ आले असले तरी सायबर क्राइमही वाढला आहे. फेसबुक, व्हॉटस्ॲप आदी सामाजि‍क माध्यमातून फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. यात मोठ्या प्रमाणावर महिला बळी पडत आहेत. अशा वेळी तंत्रज्ञानाच्या होत असलेल्या दुरपयोगाबद्दल जाणीव जागृती करण्याच्या दृष्टीने सायबर सेफ वुमेन मोहिम कार्यक्रम घेण्यात येत आहेत. महिलाच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दल अविरत सज्ज आहे.

या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलताना सायबरतज्ज्ञ विनायक राजाध्यक्ष म्हणाले, दिवसेंदिवस समाजमाध्यमांचा वापर वाढत असून सायबर क्षेत्रात महिलांबाबत असुरक्षितता वाढली आहे. प्रोफाईल हॅकिंग, लिंक बेटींग, ऑनलाईन शॉपींग, सायबर स्टेकींग, सायबर बुलींग यासारख्या बाबींना महिला मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत त्यामुळे बदलत्या काळात महिलांनी आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून समाजमाध्यमांचा अधिक दक्षतेने वापर करावा.

ॲड. मुक्ता दुबे यांनी महिलांवरील अत्याचार व त्यासंबधात असणाऱ्या कायद्यांबाबत, न्यायिक प्रक्रियेबाबत माहिती दिली.स्वागत व प्रास्ताविक अप्पर पोलिस अधिक्षक मनिषा डुबुले यांनी केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी मानले. या कार्यक्रमाला विविध शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्या, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, महिला दक्षता समितीच्या सदस्या, पोलिस यंत्रणेतील विविध अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.




 

Web Title: Cyber-Safe Women's Campaign Vital: Mayor Sangeeta Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.