घनश्याम नवाथेसांगली : कारागृहाचा उद्देश हा गुन्हेगाराला समाजापासून वेगळे करून त्याला चुकीची जाणीव करून देणे हा असतो. परंतु बऱ्याचदा वास्तव उलट होते. सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात येऊन किरकोळ गुन्ह्यातील गुन्हेगारही सराईत बनतात. सांगलीतील कारागृहात हाणामारीच्या घटना पूर्वीही घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी दोघा सराईत गुन्हेगारावर एका टोळक्याने हल्ला केल्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणा चव्हाट्यावर आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त बंदी असलेल्या कारागृहावरील ताण पुन्हा अधोरेखित झाला आहे.सांगलीतील ब्रिटिशकालीन कारागृह किरकोळ शिक्षा झालेल्या कैद्यांसाठी तसेच गंभीर गुन्ह्यातील न्यायालयीन बंदी यांच्यासाठी आहे. येथील कारागृहाच्या दगडी भिंतीच्या आड कैद्यांची काळजी घेण्यासाठी सतत पाठपुरावा केला जातो. कैद्यांना सकाळी चहा, नाश्ता, दूध, केळी, भाजीपाला असलेले गरम जेवण दिले जाते. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत त्यांचा शिस्तबद्ध दिनक्रम ठरलेला असतो. दगडी भिंती आणि तटबंदी वगळल्या तर घरात असल्याप्रमाणे भावना निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. परंतु काहीवेळा सराईत गुन्हेगारांमुळे येथील शांतता धोक्यात येते. क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांचा येथे भरणा केला जातो. त्यामुळे त्यांना सांभाळताना कारागृह प्रशासनाला कसरत करावी लागते.जिल्हा कारागृहाची क्षमता २३५ कैद्यांची आहे, तिथे ४०० ते ४३० कैदी असतात. त्यामुळे कारागृह प्रशासनावर प्रचंड ताण येणे होय. जागा मर्यादित असल्यामुळे कैद्यांमधील वैयक्तिक संघर्ष वाढतो. कधी-कधी तो उफाळून येतो. कधी-कधी एकमेकाविरुद्ध कुरघोड्या करणाऱ्या टोळ्या एकत्र आल्या की खुन्नस देण्याचा प्रकार घडतो. त्यामुळे एकमेकाच्या विरोधातील टोळ्यांना अन्यत्र स्थलांतरित करावे लागते. कारागृहात केवळ शिक्षा भोगली जात नाही, तर अनेकदा तिथे गुन्हेगारीचे नवे जाळे विणले जाते. बाहेरचे टोळी युद्ध जेव्हा आत पोहोचते, तेव्हा कारागृह हे सुधारगृह न राहता 'टोळ्यांचे रणांगण' बनते.जिल्हा कारागृहात अंडर ट्रायल कैद्यांची संख्या जास्त असते. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा भरणा जास्त असल्यामुळे वातावरणात सतत तणाव असतो. अपुऱ्या मनुष्यबळामुळे ४०० हून अधिक कैद्यांवर चोवीस तास नजर ठेवणे कठीण होते. दोन दिवसांपूर्वी १६ जणांच्या टोळक्याने एकत्र येऊन दोघांवर हल्ला केल्यामुळे कारागृह प्रशासनाच्या धाकावर प्रश्नचिन्ह निर्माण राहिले. नियमित दिनक्रमामध्ये मोकळ्या मैदानात कैद्यांना सोडल्यानंतर हल्ल्याचा प्रकार घडल्यामुळे भविष्यात अशा हिंसक घटना टाळण्यासाठी उपाययोजनांची आवश्यकता भासू लागली आहे.
नवीन कारागृहाची आवश्यकताब्रिटिशकालीन कारागृहाची क्षमता २३५ इतकी आहे. परंतु कारागृह सदैव तुडुंब भरलेले असते. गंभीर गुन्ह्यातील संशयितांची संख्या जास्त असते. एकमेकांविरुद्ध कार्यरत टोळ्या एकत्र येणार नाहीत यासाठी दक्ष राहावे लागते. परंतु खतरनाक गुन्हेगार असल्यामुळे कोणाच्या डोक्यात काय शिजते कळत नाही. त्यामुळे जास्त क्षमतेचे नवीन कारागृह आवश्यक बनले आहे.
स्थानिक नेटवर्क तोडण्याची गरजकारागृह हे कैद्यांना सुधारण्यासाठी अस्तित्वात आले आहे. परंतु बऱ्याचदा उलट चित्र निर्माण होते. किरकोळ गुन्ह्यातील कैदी सराईतांच्या संपर्कात येऊन त्यांचे नेटवर्क निर्माण होते. बाहेर आल्यानंतर मग त्यांचे नेटवर्क वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी कार्यरत होते. याचा अनेकदा पोलिस तपासात उलगडा झाला आहे. त्यामुळे हे नेटवर्क निर्माण होऊ नये यासाठी फार प्रयत्न करावे लागतात.
कारागृहाची सुरक्षा अभेद्य हवीकाही दिवसांपूर्वी कारागृहाच्या तटबंदीवरून उडी मारून कैदी पळाला होता. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली होती. कारागृहात गांजा टाकण्याचे प्रकारही यापूर्वी घडले आहेत. आता कैद्यांच्या एका टोळक्याने दोघांवर हल्ला केल्यामुळे अंतर्गत सुरक्षा व्यवस्था आणखी काटेकोर आणि सुरक्षित करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. कैद्यांचे वर्गीकरण व्यवस्थित करून त्यांना बाहेर काढण्याच्या वेळा वेगवेगळ्या केल्या पाहिजेत.
कैद्यांवर हल्ल्याच्या घटनामोकाअंतर्गत कारवाई झालेल्या करण पाटील या संशयितावर चार वर्षांपूर्वी तिघांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. तसेच आतमध्ये एकमेकांना खुन्नस देण्याचे प्रकार सतत घडत असतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाला सतत सतर्क राहावे लागते.
Web Summary : Sangli jail faces security breaches due to overcrowding and gang violence. A recent attack highlights the need for improved security, a new facility, and strategies to break criminal networks forming within the prison walls. Overpopulation strains resources and fuels inmate conflicts.
Web Summary : सांगली जेल में भीड़भाड़ और गिरोहों के झगड़ों के कारण सुरक्षा में सेंध लग रही है। हाल ही के एक हमले से बेहतर सुरक्षा, एक नई सुविधा और जेल की दीवारों के भीतर बन रहे आपराधिक नेटवर्क को तोड़ने की रणनीतियों की आवश्यकता उजागर हुई है। अधिक जनसंख्या संसाधनों पर दबाव डालती है और कैदियों के बीच संघर्ष को बढ़ाती है।