विट्यात पाच सावकारांवर गुन्हा
By Admin | Updated: July 4, 2014 23:59 IST2014-07-04T23:15:55+5:302014-07-04T23:59:03+5:30
भाळवणी येथील प्रकार : दोघांना अटक

विट्यात पाच सावकारांवर गुन्हा
; कर्जाच्या वसुलीसाठी मारहाण विटा : शेतीच्या कामासाठी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी भाळवणी (ता. खानापूर) येथील प्रमोद राजाराम क्षीरसागर (वय ४१) यांना धमकी देऊन मारहाण करणाऱ्या पोपट नामदेव यादव (मृत), त्यांची पत्नी श्रीमती मालन, मुलगा अमोल, प्रदीप पोपट यादव (सर्व रा. रामापूर, ता. कडेगाव) व दिलीप पांडुरंग चव्हाण (रा. भाळवणी) या पाच सावकारांविरूध्द विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी अमोल यादव व दिलीप चव्हाण या दोघांना अटक केली असून अन्य दोघेजण फरार झाले आहेत. भाळवणीतील प्रमोद क्षीरसागर यांनी १९९७ ला रामापूरचे पोपट यादव या सावकाराकडून शेतीकामासाठी २० हजार रूपये कर्ज घेतले होते. त्यावेळी कर्जाच्या मोबदल्यात यादव यांनी क्षीरसागर यांच्या गट नं. ६५७/अ मधील ९१ गुंठे जमिनीचे ३२ हजार रूपयाला गहाण खरेदीपत्र करून घेतले होते. त्यानंतर क्षीरसागर यांनी २००३ ला बहिणीकडून ४५ हजार रूपये घेऊन यादव यांनी दिलेल्या कर्जाची परतफेड केली होती. मात्र, त्यावेळी यादव यांनी अजून १० हजार रूपये राहिल्याचे सांगत गहाण खरेदीपत्र परत केले नाही. त्यानंतर २८ फेब्रुवारी २००८ ला पोपट यादव यांचा मृत्यू झाला. त्यानंतर क्षीरसागर यांनी पुन्हा यादव याची पत्नी श्रीमती मालन, मुलगा अमोल, प्रदीप व भाचा दिलीप चव्हाण यांच्याकडून मुलाच्या शिक्षणासाठी २०१० ला पुन्हा १० टक्के व्याजदराने १५ हजार रूपये घेतले. त्यानंतर १५ हजार रूपये कर्जाचे व्याजासह १ लाख २० हजार रूपये द्यावेत, यासाठी श्रीमती मालन, मुलगा अमोल, प्रदीप व भाळवणीचा नातेवाईक दिलीप चव्हाण यांनी क्षीरसागर यांच्याकडे तगादा लावून त्यांना शिवीगाळ करीत धमकी देऊन मारहाण केली. त्यामुळे अखेर प्रमोद क्षीरसागर यांनी मृत सावकार पोपट यादव, त्याची पत्नी श्रीमती मालन, मुलगा अमोल, प्रदीप व भाळवणी येथील भाचा दिलीप चव्हाण या पाच जणांविरूध्द विटा पोलिसांत गुन्हा दाखल केला. अमोल यादव व दिलीप चव्हाण या दोघांना अटक केली असून अन्य दोघेजण फरार झाले आहेत. (वार्ताहर)