उपअभियंत्यांना रस्त्यासाठी घेरावो
By Admin | Updated: January 28, 2015 01:02 IST2015-01-28T00:30:02+5:302015-01-28T01:02:14+5:30
विट्यात आंदोलन : दुरूस्तीसाठी पंधरा दिवसांची मुदत

उपअभियंत्यांना रस्त्यासाठी घेरावो
विटा : शहरातील कऱ्हाड रस्त्यावर असलेल्या ओढ्यापासून ते रिलायन्स पंपापर्यंतचा अपघातास निमंत्रण ठरत असलेला रस्ता तातडीने दुरूस्त करून पुलाची रूंदी वाढवावी, या मागणीसाठी आज, मंगळवारी दुपारी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही. व्ही. साखरे यांना नागरिकांनी घेरावो घातला. यावेळी उपअभियंता साखरे यांनी विटा-कऱ्हाड रस्त्याची येत्या आठ दिवसांत तातडीने दुरूस्ती करून पुलाची उंची वाढविण्यात येईल, असे आश्वासन दिले. मात्र, नागरिकांनी आठ दिवसांऐवजी पंधरा दिवसांची मुदत अधिकाऱ्यांना देऊन या कालावधित रस्ता दुरूस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.
विटा ते कऱ्हाड रस्त्यावर असलेल्या ओढ्यावरील पूल अत्यंत अरूंद आहे; तर रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने पंधरा दिवसांत पाच ते सात मोठे अपघात होऊन लोकांना जीव गमवावा लागला आहे. ओढ्यावरील पूल अरूंद असल्याने दोन वाहने एकाचवेळी पास होत नाहीत. त्यामुळे या भागात मोठे अपघात होत आहेत. परिणामी, रस्त्याची दुरूस्ती करून पुलाची रूंदी वाढवावी, यासाठी आज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुकेश जगताप, गणेश गायकवाड, राजेंद्र शितोळे, कुमार पवार, अनिल गायकवाड, कुमार शितोळे, सचिन गायकवाड, सदाशिव शितोळे, प्रशांत गायकवाड, दिलीप राठोड, सुनील गायकवाड, मनोहर सावंत, शंकर पवार, विनोद कुरळे, सुनील पाटील आदींसह नागरिकांनी उपअभियंता साखरे यांना घेरावोे घातला. त्यावेळी उपअभियंता व्ही. व्ही. साखरे यांनी आठ दिवसांत रस्त्याची दुरूस्ती व पुलाची रूंदी वाढविण्याचे अंदाजपत्रक तयार केले जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, नागरिकांनी पंधरा दिवस कालावधी घ्या, पण हे काम तातडीने करा, असे सूचविले. या कालावधित काम सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी दिला. (वार्ताहर)