वैद्यकीय महाविद्यालयात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले, सोलापुरातील अधिवेशनात चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 17:01 IST2024-12-30T17:01:03+5:302024-12-30T17:01:37+5:30
सांगली : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत चालणाऱ्या राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, असा आरोप अखिल भारतीय ...

वैद्यकीय महाविद्यालयात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढले, सोलापुरातील अधिवेशनात चौकशीची मागणी
सांगली : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत चालणाऱ्या राज्यभरातील वैद्यकीयमहाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनात करण्यात आला. तो थांबवून विद्यार्थ्यांच्या लुटीला आळा घालावा, अशी मागणीही करण्यात आली.
सोलापुरात परिषदेचे ५९ वे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन २३ ते २५ डिसेंबरदरम्यान झाले. रखडलेली प्राध्यापक भरती, विद्यार्थी परिषदेच्या बंद निवडणुका, वाढती बोगस महाविद्यालये, संविधानिक संस्थांवर शंका उपस्थित करणे, आदी बाबींवर अधिवेशनात विचारविमर्श झाला. या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घ्यावा असा ठराव मंजूर करण्यात आला. नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. शांतिनाथ बागेवाडी, प्रदेशमंत्री अथर्व कुलकर्णी, आदी उपस्थित होते. प्रकुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे, अभाविपचे राष्ट्रीय सह संघटनमंत्री देवदत्त जोशी, आदींच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
पेपरफुटी, महाविद्यालयीन निवडणुका, विद्यापीठातील भ्रष्टाचार, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी भरती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठातील गलथान कारभार या विषयांवर चिंता व्यक्त करण्यात आली. पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथी, बार्टी, महाज्योती संस्थांच्या माध्यमातून सरसकट अधिछात्रवृतीचे स्वागत करण्यात आले. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अमृत संस्थेचे माध्यमातून अधिछात्रवृती घोषणेची अंमलबाजवणी करण्याची मागणी झाली.
वैद्यकीय महाविद्यालयांत विद्यार्थ्यांकडून दंड वसुली, उपस्थितीची टक्केवारी अपूर्ण असल्यास विद्यार्थ्यांकडून परीक्षेला बसण्यासाठी जादा पैसे घेणे असे प्रकार शासनाने रोखावेत, असा ठराव झाला. सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना महापुरुषांची नावे देण्याच्या शासन निर्णयाचे स्वागत करण्यात आले.