विठ्ठलाच्या पूजेचा कायदा दुरुस्त करा
By Admin | Updated: July 5, 2014 00:07 IST2014-07-04T23:04:46+5:302014-07-05T00:07:39+5:30
भारत पाटणकर : अन्यथा विठ्ठलाची पूजा रोखू

विठ्ठलाच्या पूजेचा कायदा दुरुस्त करा
सांगली : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बहुजन आणि अठरापगड जातींचे दैवत असून त्यांची पूजा पुरुषसूक्त मंत्रानेच करावी, अशी घटनात्मक तरतूद केली आहे. हे पूर्णत: चुकीचे असून पूजेसंबंधीचे ते वाक्य कायद्यातून काढून टाकावे, कायद्यात दुरुस्ती करीत असल्याचे लेखी पत्र मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चार दिवसांत द्यावे, अन्यथा ९ जुलै रोजी त्यांना विठ्ठलाची पूजा आम्ही करू देणार नाही, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला.
डॉ. पाटणकर म्हणाले की, विठ्ठल अठरापगड आणि बारा बलुतेदारांचे दैवत होते. त्यांनी कधीही जातीभेद आणि वर्णभेद केला नाही. असे असताना त्याच्या पूजेबद्दल मूठभर लोकांनी कायद्यातच चुकीची तरतूद करून बहुजन समाजाचा अपमान केला आहे. बडवे आणि उत्पातांना हटविण्यासाठी आम्हाला पन्नास वर्षांचा लढा द्यावा लागला. यापुढे विठ्ठलाच्याबाबतीत पूजेसंबंधीची चुकीची माहिती पसरविली जात आहे. विठ्ठलाची पूजा पुरुषसूक्त मंत्रातच झाली पाहिजे, असा अट्टाहास असू नये.
कायद्यात तशी तरतूद करून सर्वसामान्य जनतेवर अन्याय केला आहे. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल मंदिराच्या महापूजेसंबंधी कायद्यात पुरुषसूक्त मंत्राचा असलेला उल्लेख काढून टाकावा. यासाठी मुख्यमंत्र्यांना चार दिवसांची मुदत देण्यात येत आहे. त्यांनी आषाढी एकादशीपूर्वी यासंबंधीचे लेखी आश्वासन दिले नाही, तर मुख्यमंत्र्यांना विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करू दिली जाणार नाही. यावेळी तीव्र आंदोलन करणार असून यामध्ये त्यांनी पोलीस बळाचा वापर केल्यास सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांची राहील, असेही पाटणकर यांनी स्पष्ट केले आहे.