पालिकेची थकबाकी शंभर कोटींवर

By Admin | Updated: July 7, 2014 00:41 IST2014-07-07T00:41:07+5:302014-07-07T00:41:36+5:30

अर्थकारण बिघडले : वसुलीसाठी विशेष प्रयत्नांची गरज

The corporation's outstanding hundred crores | पालिकेची थकबाकी शंभर कोटींवर

पालिकेची थकबाकी शंभर कोटींवर

सांगली : महापालिकेचे अर्थकारण एलबीटीमुळे बिघडले असताना, घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता कराच्या थकबाकीचा डोंगरही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या सर्वच विभागांची मिळून शंभर कोटीहून अधिक थकबाकी आहे. ही थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
महापालिका हद्दीत एलबीटी लागू झाल्यापासून पालिकेच्या आर्थिक स्थितीला घरघर लागली. गेले वर्षभर व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन पुकारल्याने उत्पन्नात दरमहा तीन ते चार कोटीची घट झाली. तरीही एलबीटी विभागाने महिन्यासाठी चार ते पाच कोटीची वसुली करून पालिकेला चांगलाच हातभार लावला. शासनपातळीवर एलबीटीबाबत संभ्रम असल्याने उत्पन्नातही महिन्याकाठी चढ-उतार होत होता. सध्या कर्मचाऱ्यांचे वेतन भागविणेही जिकिरीचे झाले आहे. दोन-दोन महिने वेतनाची प्रतीक्षा करण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. जकातीवेळी वर्षाकाठी ११० कोटीचे उत्पन्न मिळाले होते, तर एलबीटीतून वर्षभरात ५० कोटी जमा झाले. नुकतेच आयुक्त अजिज कारचे यांनी व्यापाऱ्यांकडे ६० कोटीचा एलबीटी थकल्याचे वक्तव्य केले होते.
एलबीटी हा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असला तरी घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. एचसीएल बंद झाल्याने घरपट्टीची बिले वेळेवर नागरिकांना पोहोचू शकली नाहीत. नव्याने बिले तयार करून ती नागरिकांना देईपर्यंत मार्च महिना उजाडला होता. घरपट्टीची मागील थकबाकी २३ कोटीच्या घरात आहे, तर चालू घरपट्टीही तितकीच म्हणजे २३ कोटी आहे. या एकाच विभागाकडून सुमारे ४८ ते ५० कोटीचे उत्पन्न थकले आहे. पाणीपट्टीच्या थकबाकी वसुलीला गेल्या दोन वर्षात चांगलाच वेग आला आहे. १३ ते १४ कोटीची थकबाकी आता साडेसात कोटीपर्यंत आली आहे. या विभागालाही यंदा एचसीएलचा फटका बसला. त्यामुळे मार्चमध्ये एकदम चार महिन्यांची बिले नागरिकांना द्यावी लागली. परिणामी चालू वर्षाच्या थकबाकीतही वाढ झाली आहे. एकूणच महापालिकेच्या थकबाकीचा वेलू शंभर कोटीवर पोहोचला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The corporation's outstanding hundred crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.