मनोरुग्णांना कोरोनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:23 IST2021-02-05T07:23:34+5:302021-02-05T07:23:34+5:30

गतवर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून सहा महिने लॉकडाऊन काळात मनोरुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा ...

Corona hits psychiatrists | मनोरुग्णांना कोरोनाचा फटका

मनोरुग्णांना कोरोनाचा फटका

गतवर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून सहा महिने लॉकडाऊन काळात मनोरुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अचानक उद्‌भवलेल्या या परिस्थितीमुळे मनोरुग्णांत वर्तणूक समस्या दिसून आल्या. स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव नसलेल्या मनोरुग्णांची काळजी घेणे व त्यांना सुरक्षित ठेवणे हे नातेवाईकांसाठी आव्हान ठरले. घरातच राहावे लागल्याने चिडचिड, आदळआपट, वस्तूंची तोडफोड अशा हिंसक कृती दिसून आल्या. लॉकडाऊनमुळे घरी त्यांचे उपचार कसे सुरू ठेवायचे, ही चिंता नातेवाईकांसाठी खूपच मानसिक व शारीरिक तणावाची होती. मनोरुग्ण खूप हट्टी व ताकदवान असतात. त्यांच्या इच्छेविरुद्ध काही करता येणे शक्य होत नाही. त्यांना एका विशिष्ट दिनचर्येची सवय असते. लाॅकडाऊनशी जुळवून घेता येत नसल्याने मानसिक आजारात वाढ झाल्याचे निदर्शनास आले. अनेक मनोरुग्ण साबणाने हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग यास तयार झाले नाहीत, तर भीतीचा आजार असलेल्या मनोरुग्णांना, मलाही कोरोना होईल या भीतीने ग्रासले होते. असे रुग्ण वारंवार साबणाने हात धुणे सॅनिटायझर लावणे असा प्रकार करीत होते. लॉकडाऊनच्या दरम्यान डॉक्टरांचे औषधोपचार मिळाले नसल्याने निम्म्या रुग्णांना पुन्हा उपचारासाठी दाखल करावे लागले. मनोरुग्णांना औषधे कायम घ्यावी लागतात. अनेक रुग्णांना त्यांच्या गावात औषधे उपलब्ध झाली नसल्यानेही आजाराची तीव्रता वाढल्याचे चित्र होते.

चाैकट

आर्थिक भुर्दंड

मिरजेत कर्नाटकातून उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्ण येतात. लाॅकडाऊन काळात सहा महिने सीमा बंद असल्याने कर्नाटकातील रुग्णांचे हाल झाले. औषधांची अत्यंत गरज असलेल्या रुग्णांना सीमेवर जाऊन औषधे देण्यात आल्याचे मनोविकार तज्ज्ञ डाॅ. चंद्रशेखर हळिंगऴे यांनी सांगितले. अद्याप रेल्वे बंद आहेत. परजिल्ह्यातून मिरजेत नियमित उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना एसटीचा खर्च परवडत नसल्याने आर्थिक भुर्दंड सुरू आहे.

Web Title: Corona hits psychiatrists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.